मुंबईकरांच्या पाणीपट्टीत केलेल्या आठ टक्के दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता लक्षात घेत शिवसेना सदस्यांनी पोईसर नदीवरील रेंगाळलेल्या पुलाच्या प्रश्नाचा आडोसा घेत स्थायी समितीची बैठकच शुक्रवारी तहकूब केली. मानापमान नाटय़ात नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्तांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत पाणीपट्टीच्या विषयाला साफ बगल दिली. अर्थात पाणीपट्टीवर चर्चा झाली नसली तरी रविवारपासून मुंबईकरांचे पाणी मात्र महागणार आहे.
पाणी दरवाढीचा प्रस्ताव शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेत समाविष्ट करण्यात आला होता. हा प्रस्ताव चर्चेला आला असता तर शिवसेना-भाजपवर नामुष्की ओढवली असती. अशा वेळी माजी उपमहापौर, भाजप नगरसेविका शैलजा गिरकर युतीच्या मदतीला धावल्या. कांदिवलीच्या पोईसर नदीवरील पुलाचे काम नवदीप कन्स्ट्रक्शन करीत आहे. गणेशोत्सव काळात या पुलावरून गणेशमूर्ती जात असल्यामुळे दोन महिने काम बंद ठेवण्याची विनंती शैलजा गिरकर यांनी केली होती. मात्र गिरकर यांच्या विनंतीमुळे मार्च ते सप्टेंबर २०१२ या काळात पुलाचे काम बंद ठेवण्यात आले होते. तसेच स्थानिक संस्था कराविरुद्ध (एलबीटी) व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे पुलाचे काम रखडल्याचे प्रशासनाने उत्तरात नमुद केले होते. या उत्तरास गिरकर यांनी आक्षेप घेत सभागृह झटपट तहकूब करण्याची मागणी केली. या कामास अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता यांच्यामुळे विलंब झाला असून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी मनोज कोटक यांनी केली.
रस्ते, पूल, उद्याने, मैदाने, नाले आदींबाबत प्रश्न निर्माण झाले असून त्यामुळे मुंबईकरांना फटका बसत आहे. याबाबत पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याशी चर्चा करुन प्रश्न मार्गी लावावेत असे आदेश देत स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी बैठकीचे कामकाज तहकूब केले.
परंतु कोंबडे झाकले तरी उगवायचे राहात नाही या न्यायाने स्थायी समितीत शिवसेना-भाजपने गोलमाल केला तरी रविवारपासून मुंबईकरांच्या पाणीपट्टीत वाढ होणारच आहे.