24 February 2019

News Flash

सेनेच्या अडवणुकीमुळे प्रशासन हैराण

स्थायी समितीसमोरील १३ प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय

( प्रतिकात्मक छायाचित्र )

स्थायी समितीसमोरील १३ प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय

शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या मुंबई महापालिकेतील स्थायी समितीने थेट नागरिकांशी निगडित कामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याऐवजी शीतपेटीत बंद करण्याचा सपाटा लावला असल्यामुळे अनेक कामे रेंगाळली आहेत. त्यामुळे आता प्रशासनानेही मंजुरीसाठी स्थायी समितीमध्ये सादर केलेले प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय घेतला असून येत्या बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत १८ पैकी तब्बल १३ प्रस्ताव मागे घेण्याची तयारी सुरू केली असून त्याबाबतचे पत्र पालिकेच्या चिटणीस विभागाला सादर केले आहे.

मुंबईमधील कचरा गोळा करून तो कचराभूमीत वाहून नेण्याबाबतच्या कामांचे प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या मंजुरीसाठी बैठकीत सादर केले होते. मात्र दीर्घकाळ या प्रस्तावांना स्थायी समितीकडून मंजुरी मिळू शकली नाही. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बैठकीत या प्रस्तावांचे विषय पुकारले. मात्र त्यावर कोणतेच भाष्य न करता राखून ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केले. असा प्रकार नागरी कामांशी निगडित प्रस्तावांबाबत वारंवार घडत आहे. त्यामुळे अनेक कामे रेंगाळले आहेत.

सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येणारी अडवणूक लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने आता कंत्राटदारांना कामे देण्याचे प्रस्ताव माघारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्थायी समितीच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यापूर्वी तो पालिका चिटणीस कार्यालयाला द्यावा लागतो. स्थायी समिती अध्यक्षांच्या सूचनेनुसार बैठकीची कार्यक्रमपत्रिका तयार करण्यात येते. प्रशासनाने चिटणीस विभागाला दिलेले प्रस्ताव आता मागे घेण्यास सुरुवात केली आहे.

येत्या बुधवारी स्थायी समितीच्या कार्यक्रमपत्रिकेवर १९ प्रस्तावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी सुमारे १३ प्रस्ताव मागे घेण्यात येत असल्याचे पत्र प्रशासनाकडून चिटणीस विभागाला देण्यात आले आहे.

सुमारे ३५ कोटी ४२ लाख रुपयांचे हे प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परिणामी, मुंबईमधील अनेक कामे रखडण्याची चिन्हे असून त्याचा थेट फटका मुंबईकरांना बसण्याची शक्यता आहे.

रखडलेले प्रस्ताव

  • दोन शाळांच्या दुरुस्तीचे १६.६७ कोटी रुपयांचे दोन प्रस्ताव
  • लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयात सुरक्षा रक्षक पुरविण्याचा २.०५ कोटी रुपयांचा प्रस्ताव.
  • सुका कचरा गोळा करण्यासाठी पाच कोटी २४ लाख २४ हजार रुपयांचे सात प्रस्ताव.
  • वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यानातील हम्बोल्ट पेंग्विनशी संबंधित कामांचा ११.४६ कोटी रुपयांचा प्रस्ताव

First Published on September 11, 2018 2:06 am

Web Title: shiv sena bmc administration