मुंबई जलमय झाल्यास प्रशासनावर खापर फोडण्याची तयारी
पावसाळ्यात मुंबई जलमय झाल्यानंतर त्याचे खापर पालिका आयुक्तांवर फोडण्याची तयारी सत्ताधारी शिवसेनेने सुरू केली असून, त्याचा प्रत्यय बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत आला. स्थायी समितीच्या बैठकीत मौन बाळगणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांना बुधवारी कंठ फुटला होता. आपल्या विभागातील कचऱ्याने भरलेल्या नाल्यांचे वर्णन करीत या मंडळींनी पालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांवर हल्लाबोल केला होता. अधिकाऱ्यांची बदली करण्याचीही मागणी या वेळी करण्यात आली.
धारावीमधील बुद्धनगर नाला, धोबीघाट नाला, जोगळेकर नाला कचऱ्याने भरला असून, पावसाळ्यात धारावी जलमय होऊन नागरिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. नालेसफाईत जी-उत्तर विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादर अपयशी ठरले असून, त्यांची तात्काळ बदली करावी, अशी मागणी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे केली. स्थायी समितीच्या कार्यक्रम पत्रिकेवरील कामकाज संपल्यानंतर हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे नालेसफाईचा प्रश्न उपस्थित करून पालिका आयुक्त अजय मेहता आणि पालिका अधिकाऱ्यांविरुद्ध आवाज उठविण्याचा निर्णय बैठकीआधीच शिवसेना नगरसेवकांनी घेतला होता. त्यानुसार शिवसेनेच्या नगरसेवकांनी आपापल्या विभागांतील नाल्यांची व्यथा मांडण्यास सुरुवात केली.
धारावीमधील नाल्यांची सफाई अण्णा गँगमार्फत केली जाते. मात्र, यंदा दत्तक वस्ती योजनेचे काम करणाऱ्या महिला बचत गटांना हे काम देण्यात आले आहे. महिला बचत गटाचे कामगार हाताने गाळ काढत आहेत. त्यांना हातमोजे अथवा गमबूट देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

८० टक्के नालेसफाई झाल्याचा दावा
पावसाळ्यापूर्वी नाल्यांतून ६० टक्के गाळ काढण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले होते. त्यापैकी ८० टक्के काम आजघडीला पूर्ण झाल्याचा दावा अतिरिक्त आयुक्त आय. झेड. कुंदन यांनी स्थायी समितीमध्ये नगरसेवकांच्या प्रश्नाला उत्तर देताना केला. मिठी नदीत डेब्रिज टाकण्यात येत असेल तर चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.