“महाभारतात जसे शिखंडी होते, तसं भाजपाचे किरीट सोमय्या हे शिखंडीच्या भूमिकेत आहेत. दोन गोष्टी आता लोकांच्या लक्षात आल्या आहेत. आता फ्रॉड हा शब्द बोलायचा नाही. या शब्दाला समानार्थी शब्द म्हणजे किरीट सोमय्या. हे आता प्रचलित धोरण झालं आहे,” असं म्हणत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर घणाघाती टीका केली. किरीट सोमय्या हे शिखंडी आहेत आणि फक्त साडी नेसवणं बाकी आहे. तेदेखील आम्ही करू असं म्हणत त्यांनी निशाणा साधला. टीव्ही ९ मराठीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान किशोरी पेडणेकर यांनी सोमय्या यांच्या आरोपांचा समाचार घेतला.

वारंवार तक्रारी करत राहायच्या, श्वानासारखा आवाज करत राहायचं आणि लोकांना केवळ डिस्टर्ब करत राहायचं हे सोमय्या यांचं काम असल्याचं पेडणेकर म्हणाल्या. “किरीट सोमय्या करत असलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत हे कायम आम्ही सांगत आलो आहोत. आम्ही कायम त्या शिखंडींना आव्हान स्वीकारून ते सिद्ध करण्यासही सांगत आहोत. सिद्ध झाल्यास कायद्याच्या चौकटीत जी शिक्षा आहे ती आम्ही भोगायला तयार आहोत. याचा अर्थ त्यांनी कायम आरोप करावे आणि आम्ही आमचा कामधंदा सोडून त्यांच्यामागे आम्ही बोलायला जावं तर ते आम्ही करणार नाही,” असं स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

आणखी वाचा- उद्धव ठाकरेंनी शपथविधीनंतर ३४५ कोटी बिल्डरला गिफ्ट दिले; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

“कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन आम्ही काम केलंय असं जर तुम्हाला वाटत असेल आणि ते सिद्ध झालं,तर कायद्याच्या चौकटीत जी शिक्षा आहे ती आम्ही भोगायला तयार आहोत. शिखंडीची भूमिका करून ते केवळ साडी नेसायचे बाकी आहेत. तीदेखील आम्ही नेसवून टाकू. मुख्यमंत्री चांगलं काम करत आहेत, महापौर म्हणून मी चांगलं काम करत आहे तर उगाच डिस्टर्ब करत राहायचं. मंत्रीमहोदयांना डिस्टर्ब करत राहायची कामं सुरू आहेत,” असंही त्या यावेळी म्हणाल्या.

आणखी वाचा- “सोमय्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, शॉक दिल्याशिवाय बेताल बडबड थांबणार नाही”

काय म्हणाले होते सोमय्या?

मुंबईच्या महापौरांनी हेराफेरी केली असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी यावेळी केली. “सातत्याने ठाकरे सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतरही एसआरए, मुंबई पोलिसांनी महापौरांवर कारवाई केली नाही. इतकंच नाही तर महापौरांनी बनावट सही करत करार केला. कागदपत्रं पोलीस ठाण्यात सादर करुन तक्रार केल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. म्हणून काल मुंबई उच्च न्यायालयात किशोरी पेडणेकर, ठाकरे सरकार, मुंबई महापालिका आणि एसआरएच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे,” अशी माहिती किरीट सोमय्या यांनी यावेळी दिली. दिवाळीनंतर याच्यावर सुनावणी होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

आणखी वाचा- रिपब्लिक वाहिनीत भाजपा खासदाराची भागिदारी होती, गोस्वामी यांचा थेट भाजपाशी संबंध; काँग्रेसचा आरोप

मुख्यमंत्र्यांवरही आरोप

उद्धव ठाकरेंनी शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी ३४५ कोटी बिल्डरला गिफ्ट दिले असा आरोप किरीट सोमय्या यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केला. “ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर २८ नोव्हेंबरला आणखी तीन घोटाळ्यांची कायदेशीर कारवाई सुरु करणार आहे. यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयात दोन जनहित याचिका आणि एक लोकायुक्तांकडे दाखल होणार आहे,” अशी माहिती यावेळी किरीट सोमय्या यांनी दिली.