विधान परिषदेसाठी ‘तगडे’ उमेदवार

विधान परिषदेच्या निवडणुकीत मालामाल उमेदवार रिंगणात असून, मतांची बेगमी करण्याच्या उद्देशाने हे सारे तगडे उमेदवार तयारीत असतानाच हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्याच्या निर्णयाने उमेदवारांनाही फटका बसला आहे.

‘एडीआर – महाराष्ट्र इलेक्शन वॉच’ या संस्थेने केलेल्या पाहणीत तीन उमेदवार आर्थिकदृष्टय़ा तगडे असल्याचे आढळून आले आहे. येत्या शनिवारी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी यवतमाळ मतदारसंघातून निवडणूक लढविणारे शिवसेनेचे तानाजी सावंत यांची संपत्ती ही ११५ कोटी रुपये आहे. मूळचे मराठवाडय़ातील असलेल्या सावंत यांना शिवसेनेने यवतमाळमध्ये आयात केले आहे. आर्थिकदृष्टय़ा तगडे असल्यानेच सावंत यांना शिवसेनेने मैदानात उतरविले आहे.

‘पुणे तेथे काय उणे’ असे म्हटले जाते. पुणे मतदारसंघातील उमेदवार एकापेक्षा एक तगडे आहेत. काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांची एकूण संपत्ती ७९ कोटींपेक्षा जास्त आहे. तर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अनिल भोसले यांची मालमत्ता ही ७४ कोटींपेक्षा जास्त आहे. पुण्यातील लढत ही चुरशीची होणार आहे.

गोंदिया मतदारसंघात राष्ट्रवादीचे तगडे नेते प्रफुल्ल पटेल यांची सारी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश जैन यांच्या विजयाकरिता पटेल यांनी सारी शक्ती पणाला लावली आहे. सातारा-सांगलीत आपल्या भावाच्या विजयाकरिता माजी मंत्री व ‘भारती’ विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम हे साऱ्या ‘तयारी’निशी रिंगणात उतरले आहेत.

सोन्याची नाणी?

हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्याच्या केंद्राच्या निर्णयाने उमेदवारांना फटका बसला आहे. यातूनच सोन्याची नाणी किंवा शब्द दिला जात आहे.