06 December 2019

News Flash

मुंबईत महिन्याभरात ‘इथे’ उभा राहणार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा?

बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र उद्धव ठाकरे हे आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्त झाल्याने शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीपर्यंत शिवसेनाप्रमुखांचा पुतळा उभा राहिल असे बोलले जात आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा नऊ फुटी उंच पुतळा दक्षिण मुंबईत उभारण्याबाबतचा प्रस्ताव गेल्या चार वर्षांपासून मुंबई महापालिकेकडे प्रलंबित आहे. मात्र, आता शिवसेना राज्यात सत्तेत आल्यामुळे २३ जानेवारी २०२० पर्यंत बाळासाहेबांच्या जयंतीदिनापर्यंत हा पुतळा उभारण्याचे काम पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

२३ जानेवारी हा बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस आहे. त्यामुळे महिन्याभराने येणाऱ्या या दिवसापर्यंत हा पुतळा उभारण्याचे काम पूर्ण होऊ शकते. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, ऑक्टोबर २०१५ मध्ये तत्कालीन मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी राजकीय गटनेत्यांच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर शहराच्या महापौर स्नेहल अंबेकर यांनी या प्रस्तावाची नोंद घेतली होती. त्यानंतर पालिकेने बाळासाहेबांचा पुतळा उभारण्यासाठी हिरवा कंदील दिला होता. पुढे याबाबतचा प्रस्ताव मुंबई वारसा संवर्धन समितीसमोर मंजुरीसाठी मांडण्यात आला होता.

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटाची त्रिकोणी जागा या पुतळ्यासाठी निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालयाच्या समोरच ही जागा आहे. फोर्ट भागातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचा ही जागा भाग आहे. दरम्यान, बीएमसीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या कामासाठी मुंबई नागरी कला आयोगाचीही संमती आवश्यक असणार आहे. या आयोगाकडून सार्वजनिक जागांमधील कलात्मक कामांचे निरिक्षण आणि देखभालीचे काम पाहिले जाते.

बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र उद्धव ठाकरे हे आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्त झाल्याने शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीपर्यंत हा पुतळा उभा राहिल असे बोलले जात आहे.

First Published on December 3, 2019 9:44 am

Web Title: shiv sena chief bal thackerays statue likly to be up in south mumbai in a month aau 85
Just Now!
X