पालघर निवडणुकीच्या प्रचारसभेत सुरू झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ क्लिपचे पुराण संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. ऑडिओ क्लिपवरून शिवसेनेवर टीका करणाऱ्या फडणवीसांवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. साम-दाम-दंड- भेद याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी सांगावा. आम्ही त्यांच्याकडून मराठी शिकायला तयार आहोत, असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला. बुंद से गई ओ हौद से नही आती, असे म्हणत, आम्ही फक्त क्लिप समोर आणली. त्यांना काय कारवाई करायची ती करू द्या. आम्ही त्या कारवाईला सामोरे जायला तयार, असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेने माझी ऑडिओ क्लिप जाहीर सभेत ऐकवली. पण ऑडिओ क्लिपमध्ये मोड- तोड करुन ती लोकांना ऐकवण्यात आली. साम-दाम-दंड- भेद याचा अर्थ कूटनीती असा होतो. कूटनीतीने प्रहार करणाऱ्यांना कूटनीतीचा उतारा द्यावा लागतो, असे माझे म्हणणे होते, अशा शब्दात फडणवीस यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले होते. त्यांच्या या वक्तव्याचाच ठाकरेंनी समाचार घेतला. पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या नालेसफाईचे काम पाहण्यासाठी आल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी फडणवीसांवर टीका केली.

मुख्यमंत्र्यांनी कळत न कळत मान्य केलंय की ही क्लिप त्यांचीच आहे. क्लिपमध्ये जर छेडछाड केली असेल असे त्यांना जर वाटत असेल. तर देशातील कोणत्याही तज्ज्ञाकडून त्यांनी त्याची तपासणी करावी, असे आव्हान त्यांनी दिले. साम, दाम, दंड, भेद याचा अर्थ कुटनिती होतो, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. आता आम्ही त्यांच्याकडून मराठी शिकायला तयार आहोत, असे ते म्हणाले.

तत्पूर्वी, फडणवीस म्हणाले होते की, ती ऑडिओ क्लिप माझीच आहे. ती ऑडिओ क्लिप १४ मिनिटांची असली तरी शिवसेनेने ती मोडून- तोडून जनतेसमोर आणली. क्लिपची पहिली आणि शेवटची दोन वाक्ये ऐकवली असती तर शिवसेना तोंडघशी पडली असती. आता मी स्वत:च ही क्लिप निवडणूक आयोगाकडे देणार आहे. मी काही चुकीचे केले असेल तर निवडणूक आयोगाच्या कारवाईला सामोरे जाण्यास मी तयार आहे. पण मी निर्दोष सुटलो तर क्लिपमध्ये मोड- तोड करुन ती जनतेसमोर आणून त्यांची दिशाभूल करणाऱ्यांवरही कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली होती.

दरम्यान, काँग्रेससह विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ क्लिपबाबत प्रशासनाकडे तक्रार केली आहे.