डी.एस.कुलकर्णींच्या बरबादीमागे मुंबई-पुण्यातील अघोरी शक्ती असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. विजय मल्ल्या, नीरव मोदी यांच्याबाबत एक शब्दही न काढणाऱ्या अघोरी शक्ती मराठी उद्योगपतीच्या मागे हात धुऊन लागले आहेत. डीएसकेंनी आतापर्यंत सचोटीने काम केले. मल्ल्या-मोदींप्रमाणे पळून न जाता ते इथेच राहिले. एका प्रतिष्ठित व प्रेरणादायी उद्योगपतीची ही धूळधाण क्लेशदायक आहे, असे म्हणत देशात मोदी यांचे राज्य आल्यापासून व नोटाबंदीचे तांडव सुरू झाल्यापासून आर्थिक मंदीची लाट उसळली आणि त्यात डीएसकेच नव्हे तर अनेक उद्योजक देशोधडीला लागल्याचे सांगत मोदी सरकारवरही टीकास्त्र डागले. डीएसकेंच्या अधोगतीस नोटाबंदीच कारणीभूत असल्याचे सेनेने म्हटले.

‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून सेनेने डीएसकेंच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधला. बांधकाम व्यवसायात डीएसके हे प्रतिष्ठेचे नाव होते. पण नोटाबंदीच्या निर्णयानंतर आर्थिक मंदीची लाट उसळली. त्यात त्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले. घराची विक्री मंदावली. डीएसके समूहाची एकूण मालमत्ता ही ९ हजार १२४ कोटी रूपयांची तर कर्ज १५०० कोटींचे आहे.

पण त्यांची ही मालमत्ता विकली जाऊ नये व डीएसके पूर्ण बरबाद होऊन तुरूंगात जावेत यासाठी काही अघोरी शक्ती मुंबई-पुण्यात कार्यरत होत्या. हे अघोरी लोक फक्त मराठी लोकांच्या मागे लागले आहेत.

भाजपा परिवारातील तरूण वर्गाची संपत्ती वर्षभरात सोळाशे किंवा सोळा हजार पटीने वाढते, त्यावर संशोधन नाही पण डीएसके व इतरांच्या बाबतीत त्यांचा नागोबा भ्रष्टाचारमुक्तीचा फणा काढतो, असे म्हणत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांना नाव न घेता टोला लगावला. डीएसकेंचे कोणी ऐकायला तयार नाही. यावेळी सरकारी वकिलावरही टीका केली. डीएसकेंनी अत्यंत थंड डोक्याने फसवणूक केल्याचे न्यायालयात सांगून सरकारी वकिलांनी शब्दांचे चांगले तारे तोडल्याचे त्यांनी म्हटले. गुंतवणूकदारांचे पैसे इतर ठिकाणी गुंतवणे नोटाबंदीमुळे अंगलट आल्याचेही शिवसेनेने म्हटले.