शिवसेनेच मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकात मराठा मोर्चासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वादग्रस्त व्यंगचित्राबद्दल शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे माफी मागितली. व्यंगचित्राच्या माध्यमातून आमचा मराठा समाजाच्या भावना दुखाविण्याचा किंवा माता-भगिनींचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. मात्र, तरीदेखील कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आणि ‘सामना’चा संपादक म्हणून मी माफी मागतो, असे उद्धव यांनी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. शिवसेना कुणासमोर झुकणारा पक्ष नाही. त्यामुळे कोणाच्याही दबावापुढे न झुकता मी माफी मागत नसल्याचेही उद्धव यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांत ‘सामना’तील व्यंगचित्रावरून वाद निर्माण करण्यात आला होता. या मुद्द्यावरून शिवसेनेविरुद्ध करण्यात आलेला अपप्रचार माझ्या जिव्हारी लागला असल्याचे यावेळी उद्धव यांनी सांगितले. या अपप्रचाराच्या माध्यमातून शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सामान्य जनतेच्या मनात असलेल्या विश्वासाच्या बळावर आम्ही या संकटावर मात केली. दरम्यान, या मुद्द्यावरून शिवसेनेविरुद्ध रान उठविणाऱ्या नेत्यांना त्यांची मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका मांडण्यास भाग पाडले पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एकदिवसीय अधिवेशन बोलवावे आणि त्याठिकाणी प्रत्येक पक्षाला त्यांची भूमिका मांडायला लावावी, अशी मागणी यावेळी उद्धव यांनी केली. मराठा आरक्षणाचा निर्णय विशिष्ट कालमर्यादेतच घेतला गेला पाहिजे. त्यामुळे  मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण कधी देणार, हे स्पष्ट करावे, असेही उद्धव यांनी सांगितले.

शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मध्ये आलेल्या वादग्रस्त व्यंगचित्रामुळे गेल्या काही दिवसांत शिवसेनेच्या खासदारांना अस्वस्थतेने घेरले आहे. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत त्याचा फटका बसण्याची भीती वर्तवली जात आहे. ‘सामना’तील व्यंगचित्र आणि त्यावरील प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची मते भाजपकडे वळविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. मराठा मोर्चे हे संकट नसून संधी आहे. मराठा नेत्यांनी मराठा समाजाचे प्रश्न सोडविलेले नाहीत. पण भाजप सरकारने जर हे प्रश्न सोडविले तर त्यातून मोठी राजकीय संधी उपलब्ध होऊ शकते, असे शहांनी सूचित केल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर ‘डॅमेज कंट्रोल’ म्हणून उद्धव यांनी माफीनाम्याचा निर्णय घेतल्याची शक्यता आहे.