आगामी केंद्र आणि राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर बोलताना सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार उद्यावर येऊन ठेपला असला तरी भाजपकडून शिवसेनेशी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात आलेली नाही. याविषयी उद्धव यांनी पत्रकारपरिषदेत स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मी काहीच ठरवलेले नाही. शिवसेना कोणाकडेही मंत्रिपद मागायला गेलेली नाही आणि जाणारही नाही. आम्हाला राज्यमंत्रिपद नको, हे मी गेल्याचवेळी स्पष्ट केले होते. अशा तुकड्यांवर बोळवण होणे शिवसेनेला मान्य नाही. त्यामुळे शिवसेना मंत्रिपदासाठी कधीही लाचार होऊन भीक मागणार नाही, असे उद्धव यांनी स्पष्टपणे सांगितले. शिवसेना हा स्वाभिमानी पक्ष आहे. आम्हाला भीक नको. मात्र, आमच्या हक्काचे आहे ते घेऊच, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासाठी २४ तासांहून कमी वेळ शिल्लक राहिल्याने उद्याच्या विस्तारात शिवसेनेला सामावून घेण्याची शक्यता फारच कमी आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा ७ किंवा ९ जुलैला विस्तार; ठाकूर, नाईक यांची नावे चर्चेत 

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापाठोपाठ राज्यातही मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, यामध्ये भाजपसह मित्रपक्षांच्या सदस्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार असल्याचे समजते. मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचे, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी नवी दिल्लीमध्ये पोहोचले असून, ते भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा करून नावे निश्चित करण्यासाठीच ही भेट होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ७ किंवा ९ जुलैला होणार असून, त्याची तारीख आजच निश्चित करण्यात येणार आहे.
रामदास आठवलेंना केंद्रात मंत्रिपदची लॉटरी; सुभाष भामरेही चर्चेत, उद्या शपथविधी