राज्यातील भाजपाचा सहकारी पक्ष शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. फडणवीस यांच्याविरोधात गृहखात्यातूनच षडयंत्र रचले जात असल्याची खंत व्यक्त कर डीएसकेप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्यावरील कारवाई ही फडणवीसविरोधी गटाची चाल असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. मराठे यांची अटक म्हणजे सुस्तावलेल्या गृहखात्याचे वाभाडे आहेत. राष्ट्रीयीकृत बँकेच्या अध्यक्षांना पुणे पोलिसांनी अटक केली याची माहिती राज्याच्या पोलीस महासंचालकांना नव्हतीच, पण गृहखाते सांभाळणाऱ्या फडणवीस यांनाही या प्रकरणात अंधारात ठेवले गेले याची खंत व्यक्त करत राज्याचे गृहखाते कोण चालवत आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
शिवसेनेने ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून फडणवीस यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. गृहखात्यातील फडणवीस यांच्याविरोधातील घुसखोरांशी कुणाचा संबंध आहे, यावर दानवे, शेलार, खडसे, गडकरी मंडळींनी झोत टाकायला हवा, असे म्हटले. मुख्यमंत्र्यांच्या भोवती कडक सुरक्षाकवच आहे व पोलीस चोख बंदोबस्त करतात. पण गृहखातेच पोखरले गेल्यामुळे शत्रु आत घुसले आहेत. स्वतःचेच लोक जेव्हा गुप्त कारवायांत रस घेऊन असे दंड-भेद करू लागतात तेव्हा राज्य प्रमुखाचे काही खरे राहत नाही हे समजून घेतले पाहिजे.
मराठे अटक प्रकरणात गृहखात्याचे धिंडवडे निघत आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री भोळे सांब आहेत. ते त्यांच्या पक्षाचे निष्ठावान सेवक आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांचा वेळ पक्षविस्तारांत, निवडणूक लढवण्यात जात असल्याने त्यांचे गृहखात्याकडे लक्ष नाही. याचा गैरफायदा फडणवीसविरोधी गटाने घेतलेला दिसतोय. दोन-चार खून करून सुटलेले काही लोक भाजपच्या अंतर्गत गोटात घुसले असून त्यांचा वावर मुख्यमंत्र्यांच्या आसपास दिसत असल्याचा आरोपही शिवसेनेने केला आहे.
First Published on June 27, 2018 5:49 am