मोदी सरकारविरोधात मांडण्यात येणाऱ्या अविश्वास ठरावाला पाठिंबा द्यावा या मागणीसाठी शिवसेनेची भेट घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तेलुगू देसम पार्टीला (टीडीपी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेळच दिला नाही. शिवसेनेच्या या भुमिकेमुळे टीडीपीला चपराक बसल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत टीडीपी एनडीएचाच घटक पक्ष होता. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यास मोदी सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत टीडीपीने एनडीएला सोडचिठ्ठी दिली होती. शिवसेना ही नेहमी भाजपाविरोधात वक्तव्ये करत असल्यामुळे टीडीपीने अविश्वास ठरावावर पाठिंबा मागण्यासाठी उद्धव ठाकरे यांना गळ घालण्याचा प्रयत्न सुरू केला होता. परंतु, ठाकरे यांनी वेळच न दिल्याने टीडीपीची पुरती निराशा झाली आहे.

दि. १८ जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात टीडीपीकडून मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे. यासाठी त्यांनी विविध पक्षांकडून पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याच अनुषंगाने टीडीपीचे काही खासदार उद्धव ठाकरे यांना भेटणार होते. परंतु, ठाकरे यांनी त्यांना वेळ न दिल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेची मोदी सरकारविरोधातील भूमिका पाहता त्यांचा पाठिंबा घेण्यात यश मिळेल अशी शक्यता टीडीपीला होती. परंतु, त्यांची ही अपेक्षा फोल ठरल्याचे दिसते.

टीडीपीने जेव्हा एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यावेळी टीडीपीने आमच्यापासून प्रेरणा घेतल्याचे वक्तव्य शिवसेनेकडून करण्यात आले होते. तसेच सेनेने आगामी निवडणुका या स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शिवसेनेकडून याबाबत अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.