शिवसेनेला पटकणारा कोणी जन्माला आला नाही व जन्मणारही नाही अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना टोला लगावला. आम्हाला कोणी लेचेपेचे समजू नका. कित्येक लाटा आल्या आणि गेल्या. भरती आणि ओहोटीला आम्ही घाबरत नाही. लाटेची आम्ही वाट लावतो. काही जण काम न करता स्वत:ची टिमकी वाजवत बसतात अशा शब्दांत पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला.

मुंबई येथे आयोजित स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

घोषणेतला फोलपणा दाखवणे म्हणजे टीका नाही. निवडणुकांत जय-पराजयापेक्षा विश्वास महत्वाचा आहे. विश्वास कमावला तर ते युद्ध पानिपतचे असेल किंवा कोणतेही युद्ध असेल ते जिंकता येते, असे म्हणत त्यांनी भाजपावर निशाणा साधला. आता आम्ही हनुमानाची जात काढत बसतो. आमच्या देवादिकांची जात विचारली जाते. आमच्या देवाची जात काढणाऱ्यांचे दात काढले जातील. आज दात पाडले…उद्या डोके फोडल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

युती झाली तर कोणाची जागा वाढेल असा सवाल करत राम मंदिराचा मुद्दा शिवसेनेने निवडणुकीसाठीच घेतल्याचे त्यांनी सांगितले. मी शिवसेनाप्रमुखांचा मुलगा आहे. ताकाला जाऊन भांडे लपवणाऱ्याची अवलाद नाही. जगातील सर्व शक्तिमान पुरूष, विष्णुचा अवतार जर राम मंदिर बांधू शकत नाही, असे सांगत असेल तर मग राम मंदिराचा मुद्दा निवडणुकीत का घेता, असे पंतप्रधान मोदींचे नाव न घेता त्यांनी प्रश्न केला. आपली युती हिंदुत्वाच्या मुद्यावर झाली होती. मला राम मंदिर पाहिजे. नितीश कुमार, रामविलास पासवान यांच्यासारख्या तुमच्या सर्व मित्रांना एका व्यासपीठावर बोलवा आणि त्यांना राम मंदिर पाहिजे की नको, हे विचारा. आजही त्यांचा विरोध आहे. आता तुम्ही ‘कॉमन मिनिमम प्रोग्रॅम’ म्हणून एकत्र येणार. १५ लाख रूपये खात्यात जमा होतील हा जुमला होता, अच्छे दिन हा जुमला होता. मग राम मंदिर हाही जुमलाच आहे का ? राम मंदिराच्या आड काँग्रेस येते असा आरोप केला जातो. ते कसे आड येतात, हे आम्हाला सांगा, असा जाबही त्यांनी विचारला. राम मंदिर हा कोर्टाचा विषय आहे मग तेव्हा का मते मागत होता ?

८ लाखांपर्यंतचे उत्पन्न असणारे सवर्ण आर्थिकदृष्ट्या मागास आहेत आणि आपल्याकडे अडीच लाखांवर आयकर भरावा लागतो. मग आता ८ लाखांपर्यंतचा आयकर बंद करणार का ? सर्व खासदारांनी असे करण्यास सरकारला भाग पाडले पाहिजे. मोदींनी हे केले आम्ही त्यांची छाती ही ५६ नव्हे तर २५६ इंचाची असल्याचे मान्य करू, असेही ठाकरे यांनी म्हटले.