काळ्या पैशावरुन शिवसेनेने पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. परदेशातील काळा पैसा भारतात आणण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपाने आता काळ्या पैशाविषयीचा तपशील उघड केला तर तपास प्रक्रियेवर प्रभाव पडू शकतो असा दावा केला आहे. मग भाजपाने निवडणुकीत दिलेले आश्वासन खोटे मानायचे का, असा सवाल त्यांनी केला आहे. परदेशातून आणलेल्या काळ्या पैशाच्या तपशिलाची मागणी केली तर सरकारच ‘नकारघंटा’ वाजवते तेव्हा काळ्या पैशाचे गूढ आणखीनच वाढते.

शिवसेनेने आपल्या ‘सामना’ या मुखपत्रातून मोदी सरकारवर तोंडसुख घेतले. शिवसेनेने पुढे म्हटले आहे की, परदेशातील काळा पैसा भारतात आणून प्रत्येक देशवासीयाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचा वादा भाजपाने केला होता. आता लोकसभा निवडणूक तोंडावर आली तरी ना देशातील काळा पैसा बाहेर आला ना परदेशातील किती काळा पैसा भारतात आला हे जाहीर झाले. याबाबत माहिती अधिकारी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. आता केंद्रीय माहिती आयोगाने पंतप्रधान कार्यालयाकडे मागणी केली. तरीही काळ्या पैशाची माहिती देण्याबाबत ‘पीएमओ’ने नकारघंटाच वाजवली आहे.

काय म्हटलंय शिवसेनेने..

* काळ्या पैशाच्या प्रकरणांचा तपास खास विशेष तपास पथकाद्वारा (एसआयटी) करण्यात येत आहे. त्यामुळे या कारवाईची माहिती आताच सार्वजनिक केली तर तपास प्रक्रियेवर परिणाम होईल, हे नेहमीचे तुणतुणे सरकारने वाजवले आहे. असेच तुणतुणे दुसऱ्या कोणी वाजवले असते तर दाल में कुछ ‘काला’ है अशी हाकाटी ज्यांनी पिटली असती तेच आता सत्तेत आहेत आणि त्याच तुणतुण्याचा आधार घेत आहेत.

* देशातील काळा पैसा, भ्रष्टाचार, दहशतवाद आणि नक्षलवाद निपटून काढण्यासाठीही याच पद्धतीने नोटाबंदीचा ‘बागुलबुवा’ उभा केला गेला, पण नोटाबंदीचा डोंगर पोखरून काळ्या पैशाचा उंदीरदेखील निघाला नाही. रिझर्व्ह बँकेच्या अहवालामुळेही ते नंतर उघड झाले.

* काळा पैसा हा देशाच्या अर्थव्यवस्थेला झालेला कॅन्सर आहे आणि त्याने देशच पोखरून काढला आहे. सरकार ही माहिती देण्यास नकार देत असले तरी इतर आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्याचे काही तपशील जाहीर केले आहेत. मागील चार वर्षांत आपल्या देशातून स्विस बँकेत पैसे जमा करण्याचे प्रमाण वाढले असल्याचे एक अहवाल सांगतो. ज्या स्विस बँकेतील काळा पैसा देशात आणण्याचे वादे केले गेले. त्याच स्विस बँकेत गेल्या चार वर्षांत सात हजार कोटी जमा झाले आहेत.