अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या अटकेप्रकरणी सुरू असलेल्या चर्चेत आता शिवसेनेने उडी घेतली आहे. सर्वच हिंदुत्ववादी लोकांना दहशतवादी ठरवले जाऊ नये, पानसरे, दाभोलकरांची हत्या करणारे कोणीही असोत, त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. पण नगास नग उभे करून हिंदूंना दहशतवादी ठरवू नका, असे म्हणत सनातन संस्थेचे अप्रत्यक्षरित्या समर्थन केले. उद्या देशावर संकट येईल तेव्हा हिंदूंची सर्व मने आणि मनगटे अशा कारवायांमुळे आधीच विझून गेलेली असतील, अशी भीती व्यक्त करत नक्षलवादी समर्थकांना ‘कथित’ नक्षलवादी समर्थक म्हटले जात आहे. पण अटकेत असलेल्या हिंदुत्ववादींचा उल्लेख थेट ‘हिंदू कट्टरपंथीय’ असा केला जातो असेही सेनेने म्हटले आहे.

रामजन्मभूमीच्या संघर्षात जे जीवावर उदार होऊन लढले त्यांची काँग्रेस राजवटीत फरफट झाल्याची टीका त्यांनी केली. ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून शिवसेनेने हिंदुत्ववादी संघटनांवर होत असलेल्या कारवाईवर भाष्य केले. राज्यात आणि केंद्रात भाजपाचे राज्य असतानाही हिंदू दहशतवादाचे ढोल बडवले जात आहेत. याचा सरकारने खुलासे करण्याची गरज असल्याची मागणी त्यांनी केली.

 

काय म्हटलंय शिवसेनेने…

* काँग्रेस राजवटीत तत्कालीन गृहमंत्री चिदंबरम यांनी ‘हिंदू दहशतवाद’ शब्दाचा उच्चार केला. आता राज्यात आणि केंद्रात भाजपाचे राज्य असतानाही हिंदू दहशतवादाचे ढोल बडवले जात आहेत. याबाबत सरकारने खुलासे करण्याची गरज आहे.

* सनातन संस्थेवर बंदी आणावी अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. मग सरकारने आधीच या मंडळींना का जेरबंद केले नाही. पकडलेले लोक सनातने आपले नसल्याचा दावा केला आहे. मग नेमके सत्य काय आहे. सध्या संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. एटीएस जे सांगेल तेच सध्या खरे मानावे लागेल.

* पंतप्रधान मोदींच्या जीवाला धोका आहे म्हणून माओवाद्यांना अटक केली जाते. त्यांच्याकडे फक्त धमक्यांची पत्रे, कागदपत्रे सापडली. पण हिंदुत्ववाद्यांकडे बॉम्ब, बंदुका, स्फोटके सापडली. नक्षलवादी समर्थकांना ‘कथित’ नक्षलवादी समर्थक म्हटले जात आहे. पण अटकेत असलेल्या हिंदुत्ववादींचा उल्लेख थेट ‘हिंदू कट्टरपंथीय’ असा केला जात आहे.

* सर्व लोक हिंदुत्ववादी म्हणून दहशतवादी ठरवले जाऊ नयेत इतकीच आमची अपेक्षा आहे. गुजरात दंगलीतील एक आरोपी अमित शहा यांना हिंदुत्वाच्या प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागला व ते आता राष्ट्रीय नेते बनले. म्हणजे हिंदुत्ववाद हा दहशतवाद किंवा कलंक नाही.

* हिंदूंना त्यांच्याच हिंदुस्थानात, खासकरून मोदी-फडणवीस यांच्या राज्यात दहशतवादी बनावे लागत असेल तर कमालच म्हणावी लागेल. मग कश्मीर खोऱयातून ज्या हिंदूंना पलायन करावे लागले त्यांनीही हाती शस्त्र घ्यायला हवे होते. तरच ते टिकले असते, पण त्यांना दहशतवादी बनायचे नव्हते. हिंदूंची मानसिकता ही अशी आहे.