मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव यांचे सूचक वक्तव्य

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी युतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू असताना ‘पुढचे सरकार आपले असेल आणि पुढचा मुख्यमंत्री? काय ते समजून घ्या..’ असे वक्तव्य करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यावर सूचक मौन बाळगले.

जागा आणि सत्तावाटपात शिवसेनेला योग्य वाटा हवा असल्याचा संदेश उद्धव यांनी दिल्याचे मानले जाते.

एसटी महामंळामध्ये  विद्युत बस दाखल होत असून देशातील अशा पहिल्या बसचे उद्घाटन गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. बुधवारीच युतीच्या चर्चेचा एक टप्पा पार पडला. त्यातून भाजप शिवसेनेला ११० च्या आसपास जागा सोडत असल्याचे वृत्त वाहिन्यांनी दिले. म्हणजे शिवसेना निम्म्या जागांचा आग्रह सोडून नमते घ्यायला तयार असल्याचे सूचित झाले. या पाश्र्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. ठाकरे यांनी जागावाटपावर भाष्य न करता थेट मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेना अजूनही ठाम असल्याचा संदेश शिवसैनिकांना देण्याचा प्रयत्न केला. स्पष्ट विधान करण्याचे टाळत ठाकरे यांनी भूमिकेबाबत संदिग्धता ठेवत तडजोडीचा एक मार्ग खुला ठेवल्याचे मानले जात आहे.

मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाच्या मुख्यालयाची इमारत, बसस्थानक व आगाराचीही पुनर्बाधणी करण्यात येणार असून या कामाचे भूमिपूजनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या ठिकाणी ४९ मजली इमारत उभारण्यात येणार असून त्यातील आठव्या मजल्यापर्यंत वाहनतळ असेल. ९ ते १४ व्या मजल्यापर्यंत एसटी महामंडळाचे मुख्यालय असेल. १५ ते ४९ वे मजले सरकारच्या विविध विभागांना भाडय़ाने देण्याचा प्रस्ताव आहे. त्यातून महामंडळास प्रति महिना अंदाजे १६.१७ कोटी  उत्पन्न मिळू शकेल.

आरटीओ आणि एसटीमध्ये  सुमारे ३८ हजार जणांना थेट नोकऱ्या देण्यात आल्या असून १५ हजार जणांची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे, असे दिवाकर रावते यांनी सांगितले.

शिवाई विद्युत बससेवा

एकदा चार्ज केल्यानंतर किमान ३०० किमीचा पल्ला गाठणारी ही बस जवळच्या दोन शहरांमधील वाहतूक सेवेसाठी चालवली जाईल. एसटीमध्ये लवकरच अशा सुमारे १५० बस दाखल होत आहेत. ही बससेवा शिवाई नावाने ओळखली जाईल. अशा पर्यावरणस्नेही बस एसटी महामंडळात दाखल करण्याची सुरुवात करून रावते यांनी एसटीचा कायापालट करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.