गटनेत्यांच्या सभेत घेतला निर्णय

सनदी अधिकारी असलेले दराडे दाम्पत्य वास्तव्यास असलेला मलबार हिल येथील महापालिकेचा बंगला ताब्यात घेण्याचा निर्णय गुरूवारी गटनेत्यांच्या सभेत घेण्यात आला. महापौर निवासासाठी या बंगल्याचा वापर व्हावा, अशी मागणी पुढे आली होती. त्यापाश्र्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आला.

शिवाजीपार्क येथील महापौर बंगल्याची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी निवड करण्यात आली. त्यामुळे महापौरांसाठी निवासस्थानाचा शोध सुरू होता. याआधी प्रशासनाकडून महापौरांसाठी भायखळा येथील राणीबागेतील महापालिकेचा बंगल्याचा पर्याय पुढे आला. मात्र त्यास खुद्द महापौर आणि सभागृहनेत्यांनी विरोध केला. त्याऐवजी मलबारहिल येथील बंगला महापौरांना द्यावा, अशी मागणी केली गेली. मात्र या बंगल्यात एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे आणि अन्न व औषध प्रशासनालयाच्या आयुक्त पल्लवी दराडे वास्तव्यास आहेत.

दराडे दाम्पत्याकडून बंगला ताब्यात घ्यावा, अशी मागणी करणारा प्रस्ताव गुरूवारी पार पडलेल्या गटनेत्यांच्या सभेत चर्चेसाठी आला. यावेळी सर्वच गटनेत्यांनी त्यास पाठिंबा दिला. भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी बंगला ताब्यात घेण्यासाठी महापालिका आयुक्त आणि महापौरांनी प्रयत्न करावा, असे स्पष्ट केले. आयुक्त अजोय मेहता यांनी महापालिका प्रशासनाने हा बंगला ताब्यात घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. तर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रशासनाला बंगला ताब्यात घेण्याची सूचना केली.