सरकार स्थापण्यासाठी काँग्रेसचा पाठिंबा गृहीत धरून शिवसेनेने सोमवारी सायंकाळी सरकार स्थापन करण्याचा दावा राज्यपालांकडे केला, पण मुदतीत काँग्रेसकडून पत्रच प्राप्त झाले नाही. पाठिंब्यावरून काँग्रेसमध्ये झालेल्या घोळाचा शिवसेनेला फटका बसला आणि तोंडघशी पडावे लागले.
काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करायचे, असा शिवसेनेचा प्रयत्न होता. यातूनच शिवसेनेने केंद्रातील सरकारमधून बाहेर पडावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी व काँग्रेसने व्यक्त केली होती. यानुसार केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला. सरकार स्थापण्याबाबत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चाही झाली. काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत शिवसेनेबरोबर हातमिळवणी करण्यास विरोध झाला होता. पण राज्यातील नेत्यांची तीव्र भावना लक्षात घेता, पुन्हा बैठक बोलाविण्यात आली.
काँग्रेसने सुमारे साडेतीन तासांच्या बैठकीनंतरही काहीच निर्णय घेतला नाही. काँग्रेसकडून पाठिंब्याचे पत्र प्राप्त होईल, अशी चर्चा सुरू झाली. साडेसातपर्यंत राज्यपालांनी शिवसेनेला मुदत दिली होती. शिवसेना नेते पावणेसात वाजता राजभवनवर पोहोचले. पण काँग्रेसकडून पाठिंब्याचे पत्रच प्राप्त झाले नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीचा पाठिंबा गृहीत धरून शिवसेनेने सरकार स्थापण्याचा दावाही केला होता. पण पाठिंब्याचे पत्र सादर करू शकले नाहीत.
काँग्रेसची बैठक रात्री आठपर्यंत सुरू होती. काँग्रेसने पाठिंब्याबाबत वेळेत पत्रच दिले नाही. काँग्रेसचे पत्र न आल्याने राष्ट्रवादीनेही राज्यपालांना पत्र दिले नाही. मित्र पक्षांनी तत्त्वत: मान्यता दिली असली तरी पत्र नंतर सादर करू, असे शिवसेनेच्या वतीने राज्यपालांना विनंती करण्यात आली. पण राज्यपालांनी पत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यास नकार दिला.
काँग्रेस व राष्ट्रवादीकडून पत्र प्राप्त न झाल्याने १४५ पेक्षा जास्त सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र शिवसेना सादर करू शकली नाही. सरकार स्थापण्याची तयारी केलेल्या सेनेच्या अपेक्षांवर यातून पाणी फिरले.
भाजप ‘थांबा आणि वाट पाहा’च्या भूमिकेत
मुंबई सत्तास्थापनेच्या घडामोडींवर भाजपचे बारीक लक्ष असून सध्या आम्ही ‘थांबा आणि वाट पाहा’च्या भूमिकेत आहोत, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांना सांगितले. काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षां’ निवासस्थानी भाजपच्या सुकाणू समितीची दुपारी आणि रात्री बैठक झाली. शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये दिवसभरात झालेल्या चर्चा, नाटय़मय घडामोडींवर भाजप नेते लक्ष ठेवून होते व समितीच्या बैठकीत त्यावर चर्चाही झाली. पुढील काही दिवसांमध्ये कोणत्या घडामोडी होतात, त्यानुसार भाजपची भूमिका ठरणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 12, 2019 1:53 am