प्रस्तावित भूमी अधिग्रहण विधेयकास शिवसेनेचा जोरदार विरोध असला तरी या मुद्दय़ावर भाजप आणि शिवसेना एकाच उद्दिष्टाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचा दावा केंद्रीय रस्तेवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी येथे केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या एक वर्षांच्या कारकीर्दीत महागाई कमी झाल्याचे सांगून राष्ट्रीय महामार्गावर १३ ठिकाणी टोलमुक्ती करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मोदी सरकारच्या एक वर्षांच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी गडकरी यांनी सह्य़ाद्री अतिथिगृहात पत्रपरिषद घेतली. एक दिशा किंवा उद्दिष्ट म्हणजे नेमके काय, याचा तपशील मात्र गडकरी यांनी दिला नाही. या वेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे आदी उपस्थित होते. भूमी अधिग्रहण विधेयक हे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच असून त्याविरोधात अपप्रचार केला जात आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. भूसंपादनासाठी ७०-८० टक्के शेतकऱ्यांची सहमती न घेणे, यासह काही मुद्दय़ांवर शिवसेनेचा या विधेयकास विरोध आहे. त्यात नेमका काय बदल झाला आहे, हे उघड झालेले नाही.
 दरम्यान, टोल मुद्दय़ावर बोलताना गडकरी यांनी अनेक ठिकाणी ई-टोल वसुली सुरू झाल्याचे सांगितले. रेल्वेमध्ये परकीय गुंतवणुकीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. जलवाहतूक व अन्य अनेक मुद्दय़ांवर गडकरी यांनी माहिती दिली.