अनधिकृत बांधकामाविरोधात तक्रार केल्याच्या वादातून कल्याणमध्ये शिवसेना नगरसेवकाने प्रभागातील एका नागरिकाला महापालिका आवारातच मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवसेना नगरसेवकाविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.

कल्याणमधील शिवसेना नगरसेवक मोहन उगले यांच्या प्रभागात शिंदेमळा हा परिसर असून या परिसरात विठूबाई शिंदे यांचे सर्व्हिस सेंटर होते. या सर्व्हिस सेंटरची शेड अनधिकृत होते. या अनधिकृत शेडवर उगले यांनी महापालिकेला कारवाई करायला लावली होती. या प्रकारानंतर विठूबाई शिंदे यांनी मोहन उगलेंविरोधात तक्रार केली होती. मोहन उगले यांनी अनधिकृत शेड उभारली असून त्यावरही कारवाई करावी अशी त्यांची मागणी होती. या मागणीसाठी विठूबाई शिंदे यांनी महापालिकेच्या बाहेर उपोषणही केले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी विठूबाई शिंदे या मंगळवारी महापालिकेत आल्या होत्या. या दरम्यान मोहन उगलेदेखील महापालिकेच्या आवारात आले. आमनेसामने आल्यावर मोहन उगले आणि विठूबाई शिंदे यांच्यात वाद झाला. उपस्थितांनी हस्तक्षेप केल्यावर प्रकरण निवळले. पण काही वेळाने विठूबाई शिंदे यांचा मुलगा अशोक हादेखील महापालिका मुख्यालयात आला. यानंतर उगले आणि अशोक यांच्यात बाचाबाचीदेखील झाली.

शिंदे कुटुंबीयांनी याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात मोहन उगलेंविरोधात तक्रार दाखल केली आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असल्याचे बाजारपेठ पोलिस ठाण्यातील सूत्रांनी सांगितले. तर मोहन उगले हेदेखील विठूबाई आणि त्याचा मुलगा अशोक यांच्याविरोधात तक्रार दाखल करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र या वादामुळे महापालिकेच्या मुख्यालयातील वातावरण तणावपूर्ण बनले होते.