शिवसेनेच्या नगरसेवकाची मागणी; ‘अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया’शी पत्रव्यवहार

गेल्या काही वर्षांत मुंबईत मांजरांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून भटक्या कुत्र्यांप्रमाणेच मोकाट मांजरांवरही नसबंदीची शस्त्रक्रिया करावी. तसेच मांजरांना रेबिज प्रतिबंधक लस द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ही बाब लक्षात घेत सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकाने याबाबत ठरावाची सूचना मांडून मांजरांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे भटक्या मांजरीचा बंदोबस्त करता यावा यासाठी पालिका प्रशासनाने ‘अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया’शी पत्रव्यवहार केला आहे.

पालिका अधिनियमामध्ये घरामध्ये पाळण्यात येणाऱ्या कुत्र्याबाबत नियंत्रण आणि अन्य तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. मात्र मांजरांबाबत अशी कोणतीच तरतूद करण्यात आलेली नाही. गेल्या काही वर्षांमध्ये झोपडपट्टय़ा, चाळी, वस्त्यांमध्ये भटक्या मांजरांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. मुख्यत्वे मासळी बाजारामध्ये भटक्या मांजरी मोठय़ा संख्येने मोकाटपणे फिरताना दिसतात. काही वेळा आक्रमक होऊन मांजरी नागरिकांना चावा घेतात किंवा नख मारतात. या मोकाट मांजरांमुळे नागरिकांना मोठा त्रास होऊ लागला आहे.

रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांवर पालिकेकडून निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया करून त्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यात येत आहे. त्याच धर्तीवर मांजरांवरही नसबंदीची शस्त्रक्रिया करावी आणि त्यांना रेबिज प्रतिबंधक लस द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक अनिल पाटणकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.

पालिका सभागृहाच्या फेब्रुवारी महिन्याच्या बैठकीत ही ठरावाची सूचना मांडण्यात येणार आहे. पालिका सभागृहाने एकमताने ही ठरावाची सूचना मंजूर केल्यानंतर ती पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात येणार आहे. आजवर मांजरींची गणना करण्यात आलेली नाही. त्यामुळे नेमक्या किती मांजरी आहेत हे सांगणे अवघड आहे. तथापि, मांजरांचा त्रास वाढला असून त्याबाबत अ‍ॅनिमल वेल्फअर बोर्ड ऑफ इंडिया’ला पत्र पाठवून कळविण्यात आले आहे. परंतु अद्याप त्यांनी पालिकेला काहीच कळविण्यात आलेले नाही.

मांजरांच्या निर्बिजीकरणाबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे प्रथम कायदा करावा लागेल आणि त्यानंतरच मांजरांचे निर्बिजीकरण करणे शक्य होईल. पालिकेने अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाला पाठविलेल्या पत्रात याचा उल्लेख करण्यात आला आहे. 

– डॉ. योगेश शेट्टे, महाव्यवस्थापक, देवनार पशुवधगृह

निर्बिजीकरण करण्यासाठी कायदा करणे गरजेचे आहे. मात्र निर्बिजीकरणासाठी पायाभूत सुविधांचीही गरज भासणार आहे. प्राण्यांसाठी पालिकेचे स्वत:चे असे एकही रुग्णालय नाही. त्यामुळे पालिकेने आधी प्राण्यांसाठी रुग्णालयाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. या वेळी प्राणी प्रेमींना विश्वासात घ्यावे.

-ओंकार राणे, प्राणिमित्र