News Flash

बनावट जातवैधता प्रमाणपत्रामागे ‘डोके’ कोणाचे?

गेल्या वर्षी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेतर्फे निवडणूक लढवून वडाळ्याच्या १७३ क्रमांकाच्या प्रभागातून निवडून आलेल्या एका नगरसेविकेचे जातवैधता प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड होत आहे.

| August 22, 2013 03:33 am

गेल्या वर्षी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेतर्फे निवडणूक लढवून वडाळ्याच्या १७३ क्रमांकाच्या प्रभागातून निवडून आलेल्या एका नगरसेविकेचे जातवैधता प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड होत आहे. या नगरसेविकेने आपल्या निवडणूक अर्जाबरोबर सादर केलेल्या या प्रमाणपत्राच्याच क्रमांकाचे दुसरे प्रमाणपत्रही तिच्याच नावे देण्यात आले होते. मात्र अर्जाबरोबरचे प्रमाणपत्र आपण दिलेले नाही, अशा आशयाची माहिती पुण्याच्या विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने माहितीच्या अधिकाराखाली दिली आहे. याबाबत न्यायालयात खटला चालू असून तेथेही या नगरसेविकेने सदर जातीवैधता प्रमाणपत्र आपलेच असल्याचे सांगितले आहे.
वडाळ्याच्या प्रभाग क्रमांक १७३ मध्ये अलका डोके आणि ज्योती म्हात्रे यांच्या विरोधात निवडणूक झाली होती. त्यात डोके यांनी म्हात्रे यांचा पराभव केला होता. त्यानंतर ज्योती म्हात्रे यांनी डोके यांच्या जातवैधता प्रमाणपत्राबाबत माहितीच्या अधिकाराखाली विचारणा केली. डोके यांनी निवडणूक अर्जासह विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक ३ पुणे यांनी दिलेले ६६५८४ या क्रमांकाचे प्रमाणपत्र जोडले होते. या प्रमाणपत्रावर ११ जानेवारी २०१२ ही तारीख टाकली होती.
मात्र ज्योती म्हात्रे यांनी माहितीच्या अधिकाराखाली मागवलेल्या माहितीत जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक ३ पुणे यांनी आपण अलका डोके यांना ११ जानेवारी २०१२ रोजी ६६५८४ या क्रमांकाचे कोणतेही प्रमाणपत्र दिले नव्हते. आपण डोके यांना दिलेल्या प्रमाणपत्राचा क्रमांक ६६५८४ असला, तरी हे प्रमाणपत्र आपण ४ जानेवारी २०१२ रोजी निवडणुकीच्या कामाकरता दिल्याची माहिती या विभागाने माहितीच्या अधिकाराखाली दिली. या दोन्ही प्रमाणपत्रांचे क्रमांक एकच असले, तरी दोन्हींवर भिन्न तारखा आहेत. त्यामुळे यापैकी एक बनावट असणार हे नक्की, असे ज्योती म्हात्रे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2013 3:33 am

Web Title: shiv sena corporator used fake caste certificates for bmc election
Next Stories
1 सनदी अधिकाऱ्यांच्या सोसायटीतील ‘कामधेनू’ला अभय!
2 सत्ताधाऱ्यांचा धिक्कार; चर्चगेट परिसरात सर्वस्तरीय निषेध
3 तीन संघटनांवर बंदीचा प्रस्ताव
Just Now!
X