30 September 2020

News Flash

तुंबलेल्या पाण्यावरून महापालिकेत खडाजंगी

नांदीलाच मुंबईला बुडितखाती घालत नालेसफाईचे पालिकेचे सर्व दावे फोल ठरवणाऱ्या पावसामुळे सोमवारी पालिकेच्या सभागृहात खडाजंगी झाली.

| June 23, 2015 04:11 am

नांदीलाच मुंबईला बुडितखाती घालत नालेसफाईचे पालिकेचे सर्व दावे फोल ठरवणाऱ्या पावसामुळे सोमवारी पालिकेच्या सभागृहात खडाजंगी झाली. मुंबापुरीची ‘तुंबापुरी’ होण्यामागे सत्ताधारी शिवसेनेचा नाकर्तेपणा असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या नेत्यांना धारेवर धरले. त्यामुळे शिवसेनाही आक्रमक झाल्याने या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये जुंपली.
मान्सून मुंबईत दाखल होण्यापूर्वीच सत्ताधारी शिवसेनेने आणि मुंबई महापालिकेने १०० टक्के नालेसफाई झाली असल्याचा दावा केला होता. मात्र शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसात हा दावा वाहून गेला. हाच धागा पकडून सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी एका निवेदनाद्वारे चर्चा घडवून आणली. आपल्या निवेदनाच्या सुरुवातीला आंबेरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आदरणीय, माननीय असे संबोधत त्यांच्यासह पालिकेतील शिवसेनेच्या इतर नेत्यांवर शरसंधान केले. दरवर्षी मुंबईकरांना पूरस्थितीचा सामना करावा लागतो. ‘करून दाखविले’, अशी जाहिरातबाजी करणाऱ्या पक्षाने प्रत्यक्षात नालेसफाई केलीच नाही. मग नालेसफाईचा दावा कोणत्या आधारे केला होता, असा प्रश्न आंबेरकर यांनी उपस्थित केला.
आंबेरकर यांच्या वाग्बाणांनी घायाळ झालेल्या शिवसेना नगरसेवकांनी अखेर प्रथेप्रमाणे गोंधळ घालण्यास सुरुवात केली.  मात्र, उद्धव ठाकरे यांना आपण आदरणीय, माननीय असे संबोधले आहे. ते शब्द मागे घेऊ का, असा प्रश्न विचारत आंबेरकर यांनी सेना नेत्यांना पेचात पकडले. महापौरांनी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांची समजूत काढत कामकाज पुढे चालू केले. त्यानंतरच्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि सपा या दोन्ही पक्षांनी शिवसेनेवर हल्ला चढवत नालेसफाई झालीच नसल्याचा दावा केला.

पालिका कारभारावर भाजपची श्वेतपत्रिका!
मुंबई: मुंबई महापालिकेच्या आरोग्य सेवेतील गलथानपणा आणि मालमत्ता करासह अन्य कर गोळा करूनही पुरेशी मलनि:सारण यंत्रणा उभारण्यात न आल्याने आता भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून श्वेतपत्रिका काढली जाणार आहे. भाजपने हे पाऊल उचलल्याने आता प्रशासनातील उणिवा दाखविण्याच्या निमित्ताने शिवसेनेवरच ‘बाण’ चालविण्यासाठी भाजप सरसावला आहे. पावसाळ्यात महापालिका करीत असलेल्या उपाययोजनांबाबत भाजप नगरसेवकांची मते जाणून घेण्यासाठी मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी  बैठक घेतली. आरोग्य यंत्रणेबाबत अनेक तक्रारी असल्याने महिनाभरात श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी गटनेते मनोज कोटक यांच्या अध्यक्षतेखाली सुनीता यादव,  राम बारोट आदींची समिती पक्षाने नेमली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2015 4:11 am

Web Title: shiv sena corporators clashes with congress in bmc over pre monsoon work
टॅग Bmc
Next Stories
1 मारिया-मोदी भेटीबाबत पृथ्वीराज अनभिज्ञ
2 आता विनोद तावडे यांच्या पदवीचा वाद
3 धोकादायक वाहनांच्या तपासणीप्रकरणी सरकारला आदेश
Just Now!
X