‘बेस्ट’ प्रशासनाने मुंबईमधील ५२ बसमार्ग बंद करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांच्या बेस्ट भवनावरील मोर्च्यानंतर प्रशासनाला ५२ बसमार्ग बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी लागली.  बेस्ट समितीच्या महाव्यवस्थापकांना जाब विचारण्यासाठी नगरसेवक बेस्ट भवनावर मोर्चा काढला होता.
बेस्टकडून बंद करण्यात येणारे ५२ मार्ग आधीपासूनच तोटय़ात आहेत. यात हे मार्ग नियमित चालू ठेवणे म्हणजे बेस्टच्या तोटय़ात भर घालण्यासारखे आहे. या मार्गावर १०० रुपये खर्च होत असतील तर त्यातून केवळ ३० रुपये उत्पन्न मिळत आहे. ही परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत बेस्टकडून हे ५२ मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयावरून शुक्रवारी बेस्ट समितीत चांगलाच गोंधळ देखील उडाला होता. याशिवाय, मुंबईकरांचे हित लक्षात घेऊन हे ५२ बसमार्ग शिवसेना कोणत्याही परिस्थितीत बंद करू देणार नाही, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.