News Flash

महापौरांच्या उचलबांगडीसाठी स्वपक्षीयांचे प्रयत्न?

रस्ते घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी थेट पालिका आयुक्तांना पत्र लिहिणाऱ्या महापौरांची उचलबांगडी करावी,

शिवसेनेचेच नगरसेवक स्नेहल आंबेकर यांच्यावर नाराज; सोमवारच्या बैठकीला हजर राहण्याचे नगरसेवकांना फर्मान

रस्ते घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी थेट पालिका आयुक्तांना पत्र लिहिणाऱ्या महापौरांची उचलबांगडी करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवकच करू लागले आहेत. पण शिवसेना पक्षप्रमुख मुंबईत नसल्याने तूर्तास याबाबतचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपकडून दगाफटका होण्याची शक्यता लक्षात घेऊन शिवसेना मनसेशी जवळीक साधण्याच्या प्रयत्नात असल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, पालिका सभागृहाच्या सोमवारच्या बैठकीत महापौरांचे अभिनंदन करताना शिवसेनेला लक्ष्य करण्याचा भाजपसह विरोधकांचा डाव असून शिवसेनेने आपल्या सर्व नगरसेवकांना बैठकीस उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

महापौर स्नेहल आंबेकर यांच्याकडे काम घेऊन गेल्यानंतर पदरात निराशा पडत असल्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक हैराण झाले आहेत. आता रस्ते घोटाळाप्रकरणी आयुक्तांना पत्र पाठवून शिवसेनेला अडचणीत टाकणाऱ्या आंबेकर यांची महापौरपदावरून उचलबांगडी करावी अशी शिवसेना नगरसेवकांकडूनच मागणी वाढू लागली आहे. परंतु सध्या मित्रपक्ष भाजपकडून महापौरपदाच्या निवडणुकीत साथ मिळेल की नाही याबाबत शिवसेना नेते साशंक आहेत.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच स्नेहल आंबेकर यांची महापौरपदावरून उचलबांगडी करणार अशा वावडय़ा शिवसेनेतूनच उठविल्या जात आहेत. भाजपकडून दगाफटका होण्याची शक्यता लक्षात घेऊन मनसेच्या साथीने महापौरपदाची निवडणूक लढवावी अशी शिवसेना नगरसेवकांची इच्छा आहे. त्यामुळे भाजपला शह बसेल आणि पालिकेच्या पुढील निवडणुकीवरही त्याचे पडसाद उमटतील, असे नगरसेवकांचे मत आहे. पण सध्या उद्धव ठाकरे मुंबईत नाहीत. त्यामुळे स्नेहल आंबेकर यांना महापौरपदावर ठेवायचे की नाही याबाबत तूर्तास कोणताही निर्णय झालेला नाही. दरम्यान याबाबत प्रतिक्रियेसाठी महापौरांशी संपर्क होऊ शकला नाही.

 

अनेकदा वादात..

महापौर निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात पतीसह केलेले नृत्य, साथीच्या आजारांबाबतचे वक्तव्य, महापौर निधीच्या वाटपावरून उठलेले वादळ अशा अनेक प्रकरणांमुळे स्नेहल आंबेकर वादग्रस्त ठरल्या आहेत. आता नालेसफाईबरोबरच रस्ते बांधणीतील रॅबिट वाहून नेण्यात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी पालिका आयुक्त अजय मेहता यांना पत्र पाठवून आंबेकर यांनी नवा वाद निर्माण केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2015 3:55 am

Web Title: shiv sena councilors upset with the mumbai mayor snehal ambekar
टॅग : Snehal Ambekar
Next Stories
1 इंद्राणीच्या प्रकृतीला धोका कायम
2 बेधडक हातोडा चालवा, पण न्यायालयीन प्रकरणे टाळा! अतिक्रमणविरोधी कारवाईबाबत आयुक्तांच्या सूचना
3 नेहरू सायन्स सेंटरमध्ये ‘उत्क्रांतीच्या विश्वा’ची सफर ; विशेष दालनाचे ६ ऑक्टोबरला उद्घाटन
Just Now!
X