राज्याच्या जलसंधारण मंत्रिपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध जाहीरपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या पंकजा मुंडे यांचे शिवसेनेकडून कान टोचण्यात आले आहेत. मुख्यमंत्री फक्त भाजपाचे नसून महाराष्ट्राचे आहेत याचे भान ठेवायला हवे. आपणच आपल्या मुख्यमंत्र्यांची बेइज्जती केली तर या अनागोंदीस राक्षसराज म्हणावे लागेल, असे सेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखात म्हटले आहे. इतके दिवस केवळ भाजपलाच लक्ष्य करणाऱ्या सेनेने पंकजा यांना लक्ष्य केल्याने राजकीय वर्तुळात काहीसे आश्चर्यही व्यक्त करण्यात येत आहे. गोपीनाथ मुंडे यांच्याशी असलेल्या वैयक्तिक संबंधांमुळे शिवसेनेने विधानसभा निवडणुकीच्यावेळी परळी मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध पक्षाचा उमेदवारही उभा करणे टाळले होते. त्यामुळे इतके दिवस पंकजा मुंडे यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध जपणाऱ्या सेनेच्या भूमिकेतील बदल कोड्यात टाकणारा आहे. मात्र, यामुळे जलसंधारण खाते गमावलेल्या पंकजा मुंडे यांना ‘घर फिरले की घराचे वासेही फिरतात’, या म्हणीचा प्रत्यय निश्चितच येत असावा.
पंकजाताई अधूनमधून ‘मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल,’ अशी इच्छा व्यक्त करीत असतात, पण मुख्यमंत्री कोणी व्हायचे हा निर्णय आताही दिल्लीतूनच घेतला जातो. त्यामुळे पंकजाताईंनी राजकीय चिंतन करून नवे आडाखे बांधायला हवेत. खडसे यांनाही मुख्यमंत्री व्हायचेच होते व त्यासाठीच त्यांनी शिवसेना-भाजप युती तोडायला लावली. (अशी फुशारकी ते मारतात!) पण आज खडसे घरी आहेत व देवेंद्रभाऊ मुख्यमंत्री आहेत. चाणक्याने असे लिहून ठेवले आहे की, राजकारण्याच्या नशिबाची खात्री कोणीच देऊ शकत नाही. अर्थात काही लोकांना पदे कर्तबगारीवर मिळतात तर अनेकांना ती नशिबाने मिळतात, पण नशिबाने एखादे पद मिळाले नाही म्हणून ज्या घरात आपण बसलोय त्या घरालाच आग लावायची काय? घरात ढेकूण फार झाले म्हणून घर जाळावे काय? याचाही विचार करावा लागेल. महाराष्ट्रात भाजपच्या वाट्यास आज जे आले आहे ते मोदींच्या नशिबाने लाभले आहे, पण हे भाग्य प. बंगाल, तामीळनाडू, केरळ, बिहारच्या भाजप कार्यकर्त्यांना लाभले नाही. म्हणून तेथे आदळआपट नाही व संतापाची फडफड नाही. महाराष्ट्रात भाजपचे लोक आपल्याच मुख्यमंत्र्यांचा पुतळा फुंकतात. आपणच आपल्या मुख्यमंत्र्यांची बेइज्जत केली तर या अनागोंदीस राक्षसराज म्हणावे लागेल. मुख्यमंत्र्यांना आता अधिक सावधान राहावे लागेल, असे या अग्रलेखात म्हटले आहे.