केंद्र सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त भाजपकडून करण्यात येणाऱ्या जाहिरातबाजीवरून शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. शिवसेनेच मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून सरकारला कर्ज काढून सण साजरे करण्याचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.  दोन वर्षांच्या वाटचालीनंतर मोदी यांनी पुन्हा नवे शब्द दिले आहेत. आधीच्या सरकारने काहीच केले नाही हा मंत्र नसून तुणतुणे असते. आधीच्या सरकारांनी काहीच केले नसते तर आजचा देश दिसलाच नसता. नेहरू, इंदिराजी, राजीव गांधी, नरसिंह रावांच्या नावाच्या फक्त पाट्या पुसून नवे घडणार नाही. आपला नवा इतिहास आपणच घडवायला हवा. म्हणजे तो सुवर्णाक्षरात लिहिला जाईल. हा देश सदैव उत्सवी राहिला आहे. कर्ज काढून सण साजरा करण्याची परंपरा येथे आहेच. हे कर्ज कमी झाले तरी देश पुढे जाईल, असा टोला अग्रलेखातून भाजपला लगाविण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त उत्तरप्रदेशातील सहारनपूर येथे झालेल्या सभेत मोदींनी सरकारच्या कामाचा पाढा वाचला होता. याशिवाय, अनेक नव्या घोषणाही केल्या होत्या.