मुंबई मेट्रोच्या खोदकामावरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. पावसाळा जवळ येतो आहे अशात मुंबई २०० ठिकाणी तुंबणार ही आमची भविष्यवाणी नाही तर वास्तव आहे. मेट्रोच्या खड्ड्यांइतकीच पाणी तुंबण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांना घ्यावी लागेल. मेट्रोचे स्वप्न हे अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनप्रमाणे फसवे आहे. गरज नसताना सुरु केलेले उद्योग आहेत अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करत उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमके अग्रलेखात काय म्हटले आहे? 

मुंबईच्या खड्डय़ांची चर्चा सुरू होते व खड्डय़ांचे खापर मुंबई महानगरपालिकेवर फोडून इतर सर्व बाजारबुणगे आडास तंगडय़ा लावून बसतात. पण आता या सगळय़ांच्या कानाखाली मुंबई हायकोर्टानेच आवाज काढला आहे आणि ‘मुंबईचे रस्ते कोणाच्या आदेशाने खोदताय’, असा सवाल त्या मेट्रोवाल्यांना केला आहे. विकासाच्या नावाखाली आधी मोनो रेलने मुंबईत जागोजागी खड्डे केले व आता मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मेट्रो प्रकल्पाने मुंबईभर भर उन्हाळय़ात चिखल व खड्डय़ांचे साम्राज उभे केले आहे. त्यामुळे सामान्य मुंबईकरांची दिवसभर

जी वाहतूककोंडी हेत आहे त्या कोंडीचे रूपांतर पावसाळय़ात जबडा वासलेल्या अक्राळविक्राळ मगरीत होणार अशी भीती आम्हास वाटते. एम.एम.आर.डी.ए. नावाची बाजारबसवी मुंबई महानगरपालिकेच्या छाताडावर आणून बसवल्यापासून मुंबईचे हाल हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांप्रमाणे झाले. म्हणजे मुंबईकरांना जगणे कठीण झाले आहे.

विकासाच्या नावाखाली मुंबईच्या रस्त्यांवर सरकारने अराजक निर्माण केले आहे. मेट्रोचे स्वप्न हे अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनप्रमाणेच फसवे आहे. गरज नसताना सुरू केलेले हे नसते उद्योग आहेत. पालघरच्या शेतकऱ्यांनी बुलेट ट्रेनच्या जमीन संपादनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पळवून लावले. असा हिसका मेट्रोच्या अधिकाऱ्यांना आम्हीही मुंबईत दाखवू शकलो असतो, पण काही घडतंय ते बिघडवण्याची आमची वृत्ती नाही. पावसाळय़ात तुंबणाऱ्या मुंबईची जबाबदारी सरकार, त्यांचे मेट्रो कॉर्पोरेशन घेणार नसेल तर महापालिका आयुक्त अजोय मेहता कर्तव्यदक्षतेची किती उसळी मारतात ते आता पाहायचे. ‘मेट्रेा’च्या खड्डेशाहीविरोधात आयुक्तांनी आवाज द्यावा, शिवसेना त्यांच्या पाठीशी राहील.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena criticized bjp and cm devendra fadnavis on metro issue in saamna editorial
First published on: 04-05-2018 at 06:57 IST