राज्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून शिवसेनेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यात आले आहे. फक्त ‘भारतमाता की जय’ बोलून दुष्काळाची दाहकता कमी होणार नाही, असा खोचक टोला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील आजच्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
पाण्याच्या टाक्या व टँकरवर पोलिसांचे पहारे बसविण्यात आले असून पाण्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला हे चित्र धक्कादायक आहे. ‘भारतमाता की जय’ बोलावेच लागेल, पण ते बोलण्यासाठी माणसे जिवंत राहायला हवीत. हा भारतमातेच्या स्वप्नातील महाराष्ट्र नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी खुर्चीवर बसावे आणि महाराष्ट्राला पाणी द्यावे, असे खडे बोल सेनेकडून फडणवीसांना सुनाविण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात पाण्यासाठी दंगली, मारामार्‍या सुरू झाल्याचे चित्र अस्वस्थ करणारे आहे. सध्या ‘भारतमाता की जय’चे राजकारण जोरात सुरू आहे. खुर्ची गेली तरी चालेल, पण ‘भारतमाता की जय’ बोलणारच असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ठणकावले आहे हे छानच झाले, पण भारतमातेची लेकरे पाण्यासाठी वणवण भटकत आहेत, तडफडत आहेत, पाण्यासाठी एकमेकांचे रक्त पिण्यापर्यंत प्रकरण गेले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात, घरात पिण्याचे पाणी देईन नाहीतर खुर्चीवर लाथ मारीन अशी गर्जना केली असती तर ते अधिक बरे झाले असते, अशी खोचक टीकाही अग्रलेखातून करण्यात आली आहे.