नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल म्हणजे भाजपची शत-प्रतिशत ही रणनीती अपयशी ठरल्याचे द्योतक असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. एक आसामात शतप्रतिशत (आसाम गणपरिषदेच्या सहकार्याने) सोडले तर उरलेल्या चार राज्यांत भाजप एक प्रतिशतही नाही याची वेदना आम्हाला बोचते आहे. तरीही या विजयाने भाजपमध्ये नवे चैतन्य संचारले आहे. प्रतीक्षेनंतर घरात पाळणा हलला की असे व्हायचेच. पण चार पाळणे दुसऱ्यांच्या घरातही हलले आहेत, हे भाजपने लक्षात ठेवावे, असा सल्ला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून देण्यात आला आहे.
आसामच्या निकालानंतर मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीला व ध्येय, धोरणांना जनतेने जोरदार समर्थन दिल्याचे मत या निकालात व्यक्त झाले असे म्हटले जात आहे. मात्र, आसाम वगळता अन्य चार राज्यांतही जनतेने मोदी सरकारच्या कामगिरीला, ध्येय- धोरणांना उचलून धरायला हवे होते. मात्र तसे झाले नाही. खरे म्हणजे या सर्व पक्षांनी त्या-त्या राज्यात स्वत:च्या ‘अजेंड्या’वर निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या. त्यांना मिळालेले घवघवीत यश हे त्यांच्या ‘अजेंड्या’ला स्थानिक जनतेने दिलेला प्रतिसाद आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. उद्या अमेरिकेत मि. ट्रम्प किंवा सौ. क्लिंटन कोणीही जिंकले तरी ती मोदी सरकारच्या कामगिरीची पावती ठरू शकेल का? पाकिस्तानात पुन्हा नवाज शरीफ यांच्या पक्षाचा विजय झाला तरी त्यांचे श्रेय येथे घेण्याचा प्रयत्न होईल, असा टोला सेनेने भाजपला लगावला आहे.