22 November 2019

News Flash

३५० खासदारांचे बहुमत हाच राममंदिराचा जनादेश, वनवास संपवा-शिवसेना

जो रामाचा नाही तो कामाचा नाही हा निर्णय जनतेच दिला असल्याचेही शिवसेनेने म्हटले आहे

लोकसभा निवडणूक निकालात एनडीएला ३५० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. ज्यापैकी ३०३ जागा एकट्या भाजपाने जिंकल्या. जनतेने दिलेला निर्णय म्हणजेच राम मंदिराचा जनादेश आहे. ज्या श्रीरामाने आम्हाला ३५० खासदार दिले, सत्ता दिली त्याच्या जन्मस्थानी आम्ही त्याला हक्काचे छप्पर देऊ शकत नाही? असा प्रश्न आता शिवसेनेने उपस्थित केला आहे. सामनाच्या अग्रलेखातून आता राम मंदिरासाठी विलंब नको ही साद शिवसेनेने पुन्हा एकदा घातली आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात?
श्रीरामाच्या कृपेनेच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला भव्य यश लोकसभा निवडणुकीत मिळाले. हे यश फक्त अभूतपूर्वच नाही, तर विरोधकांना भुईसपाट करणारे आहे. ज्यांनी राममंदिरास विरोध केला ते नष्ट झाले. रामाच्या नावाने समुद्रात दगडही तरले. रामसेतू उभा राहिला. त्याच रामाच्या नावाने आजचे दिल्लीतील सरकारही तरले. प. बंगालात जाऊन अमित शहा यांनी ‘जय श्रीराम’चा नारा दिला आणि प्रभू श्रीरामाने कमाल केली. ममता बॅनर्जी यांना दुर्बुद्धी झाली. श्रीरामाचे नारे देणाऱ्यांना त्यांच्या सरकारने अपराधी ठरवले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. ममता बॅनर्जींनी श्रीरामास विरोध केला म्हणून प. बंगालच्या हिंदुत्ववादी जनतेने भाजपचे 18 खासदार निवडून दिले. प. बंगालात भाजपची ताकद तोळामांसाचीच, पण रामविरोधकांना धडा शिकविण्यासाठीच बंगाली जनतेने विजयाचा रसगुल्ला भाजप तोंडी भरवला.

उत्तर प्रदेशात अखिलेश-मायावती हे ‘बाबरी भक्त’ एक झाले. राममंदिरास या दोघांचा विरोध. त्यामुळे ‘जय श्रीराम’चा नारा देणाऱ्या 61 खासदारांना विजयी करून भाजपला पूर्ण बहुमत मिळवून दिले. हे प्रभू श्रीरामाचे भांडार आहे. ते भाजप-शिवसेनेला प्रसाद म्हणून मिळाले. आता वनवासातल्या रामास मुक्त करण्याची जबाबदारी कोणाची? ती शतप्रतिशत भाजप आणि शिवसेनेचीच आहे. नितीशकुमार व रामविलास पासवान यांनाही ‘सेक्युलर’वादाच्या नावाखाली राममंदिरापासून दूर पळता येणार नाही. त्यांच्या यशातही रामनामाचा वाटा आहेच. जो रामाचा नाही तो कामाचा नाही असा निर्णय आता जनतेनेच दिला आहे. राममंदिराचा विषय कोर्टात अडकला आहे. आमच्यासाठी राममंदिर हा राजकारणाचा नसून अस्मितेचा विषय आहे. कोर्टाचा निकाल लागायचा तो लागेल, पण संपूर्ण देश राममंदिराच्या बाजूने आहे. जनतेने लोकसभा निवडणुकीतून निकाल दिला आहे. राममंदिराबाबत सर्वोच्च न्यायालय काय तो निर्णय देईल ते नंतर पाहू.

कायद्याच्या चौकटीत राहून राममंदिराचा प्रश्न सोडवू, असे पंतप्रधान मोदी सांगतात. पंतप्रधान म्हणून त्यांना कायद्याचीच भाषा करावी लागेल हे समजून घेतले पाहिजे, पण मोदी हे प्रखर हिंदुत्ववादी आहेत. ते छुपे हिंदुत्ववादी नसून उघड हिंदुत्ववादी आहेत. निवडणुकीआधी ते केदारनाथला जाऊन गुहेत तपासाठी बसले. देशातल्या ढोंगी निधर्मीवाद्यांना काय वाटेल याची पर्वा न करता ते केदारनाथच्या गुहेत बसले. दोन दिवसांपूर्वी ते केरळातील गुरुवायूर मंदिरात गेले. तेथे ते पितांबर नेसून पूजा-अर्चा करीत होते. हे त्यांचे रूप देशातील हिंदू जनतेस भावले. त्याचे पडसाद मतपेटीत उमटले. त्यामुळे मोदी-शहा यांच्या धमन्यांत राममंदिराचा विषय उसळत असेल याविषयी आमच्या मनात तरी शंका नाही. मंदिर कसे होईल, कोणत्या मार्गाने होईल याचा निर्णय आता घेतला पाहिजे.

First Published on June 18, 2019 7:05 am

Web Title: shiv sena demands ram temple special edit in saamana scj 81
Just Now!
X