महाराष्ट्र सदनमधील शिवसेना खासदारांच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त करीत केंद्र सरकारतर्फे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी अतिशय दुर्भाग्यपूर्ण व दुखद घटना, असा उल्लेख केल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याऐवजी केंद्रातील सत्ताधारी भाजपने शिवसेनेला पुन्हा फटकारल्याने शिवसेनेची पंचाईत झाली आहे.
रालोआतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना व भाजपमधील वैचारिक आणि विविध मुद्दय़ांवरील मतभेद या निमित्ताने पुन्हा पुढे आले आहेत. भाजपचा स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा असून शिवसेनेचा विरोध आहे. जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा जोरदार विरोध असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अणुउर्जेचे व प्रकल्पांचे समर्थन केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातही शिवसेनेला दुय्यम स्थान देण्यात आले असून एकच मंत्रिपद आणि अवजड उद्योगसारखे खाते मिळाल्याने शिवसेनेने नाराजीही व्यक्त केली.
त्यातच आता महाराष्ट्रसदनमधील शिवसेना खासदारांच्या आंदोलनाविरोधातही भाजपने भूमिका घेतल्याने शिवसेनेची अडचण झाली आहे. महाराष्ट्र सदनमध्ये शिवसेना खासदारांना अयोग्य वागणूक मिळत असून पुरेशा सोयीसुविधाही नाहीत. त्याविरोधात आंदोलन केले असताना त्याला धार्मिक वळण दिले गेले. त्यावरून विरोधी पक्षांनी संसदेत शिवसेनेला घेरले असताना किमान सरकारने तरी पाठराखण करणे अपेक्षित होते. मात्र भाजपने पाठिंबा न देता मौनच पाळले. सरकारतर्फे निवेदन करतानाही भाजपने हीच भूमिका घेतल्याने शिवसेनेत नाराजी आहे.