तटस्थ राहण्याचा निर्णय जाहीर करूनही काही नगरसेवक मतदान करणार या चर्चेने कोणीही नगरसेवक फिरकणार नाहीत यासाठी मनसेने केलेली तटबंदी, कोणतीही गडबड नको म्हणून शिवसेना नगरसेवकांचे गटागटाने मतदान, भाजपने ऐन वेळी शिवसेनेला धक्का दिला तर काँग्रेस व राष्ट्रवादीमधील संशयकल्लोळ हे सारे चित्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिका मुख्यालयात रविवारी बघायला मिळाले.
गेले दोन दिवस मढमधील हॉटेल रीट्रीटमध्ये पाहुणचार घेतल्यानंतर शिवसेना नगरसेवक रविवारी सकाळी आठच्या सुमारास पालिका मुख्यालयाजवळ अवतरले. शिवसेनेने चार नगरसेविका आणि एक नगरसेवक अशा पाच जणांना मतदानासाठी पालिका मुख्यालयात सोडण्यास सुरुवात केली. दीड-दोन तासांमध्ये शिवसेना नगरसेवकांचे मतदान पार
पडले.
शिवसेना नगरसेवकांबरोबर वास्तव्य करण्यासाठी मढला न जाताच भाजप नगरसेवकांनी इगतपुरीजवळील हॉटेल शांघ्रीलामध्ये मुक्काम ठोकणे पसंत केले. सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास भाजप नगरसेवक गटागटाने गाडय़ांतून आले आणि मतदान करून निघून गेले. कार्यकर्त्यांच्या घोळक्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवकही गटागटाने एकत्र मतदानासाठी मुख्यालय गाठताना दिसत होते. अपक्ष उमेदवार प्रसाद लाड यांच्या समर्थकांचा ताफा संपूर्ण दिवस ठिय्या मांडून बसला होता. राष्ट्रवादीचे नगरसेवक कोणाला मतदान करतात याबाबत काँग्रेसमध्ये संशयाचे वातावरण होते; पण राष्ट्रवादीने शब्द पाळला आणि काँग्रेसचे भाई जगताप यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
मनसेचे गटनेते संदीप देशपांडे आणि दिलीप लांडे यांनी पालिका मुख्यालयाबाहेर तळ ठोकला होता. मनसेचा एकही नगरसेवक मतदान केंद्राबाहेर फिरकला नाही.