भारतीय जनता पक्षाने कल्याण-डोंबिवली महापालिकेत स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी पावले टाकायला सुरुवात केल्यानंतर हातातील सत्ता जाऊ नये यासाठी शिवसेनेने भाजपसमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. याबाबत भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आज, शुक्रवारपासून चर्चेच्या फेऱ्यांना सुरुवात होणार आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी स्पष्ट बहुमत नसल्याने त्यांना स्वबळावर सत्ता स्थापन करता येत नाही. शिवसेने खालोखाल भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
त्यात भाजपने मनसेला बरोबर घेऊन सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या. भाजपचे हे प्रयत्न यशस्वी झाले तर हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास निसटून जाईल, या भीतीपोटी शिवसेनेने एक पाऊल मागे येत भाजपसमोर सत्तास्थापनेसाठीचा प्रस्ताव ठेवला असल्याचे सांगण्यात येते. पहिला महापौर कोणाचा, हा मुद्दाही कळीचा ठरला होता. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या चर्चेच्या फेरीत हा मुद्दाही प्राधान्याने चर्चिला जाणार असल्याचे समजते. शिवसेनेकडून चर्चेचा प्रस्ताव भाजपपुढे ठेवल्याने सत्ता स्थापनेच्या हालचालींना शुक्रवारपासून वेग येणार आहे. चर्चेच्या फेऱ्यातून लवकरच यावर तोडगा काढला जाईल, असा विश्वासही भाजपच्या सूत्रांनी व्यक्त केला.