पालिका सभागृह वेळेत सभागृह सुरू न केल्याने सोमवारी पालिका सभागृहात सेनेची नाचक्की झाली. सभागृहांत महापौरांसह सत्ताधारी सेनेचा एकही नगरसेवक उपस्थित नसल्यामुळे काँग्रेसने अन्य नगरसेवकाची महापौरांच्या स्थानी नेमणूक करण्याची मागणी केली. यामुळे महापौर स्नेहल आंबेकर या धावतच सभागृहात आल्या, मात्र सभागृह सुरू करण्यास त्यांनी नकार देत स्वत:च सभा तहकुबी मांडून महापौरांनी सेनेच्या सदस्यांची विरोधकांच्या तावडीतून सुटका केली.

सोमवारी दुपारी २.३० वाजता पालिकेत सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, दोन तास उलटूनही सभागृह सुरू झाले नाही. या वेळी सभागृहात भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व सपाचे नगरसेवक उपस्थित असल्याने सभागृहाची गणसंख्या पूर्ण झाली होती. त्यामुळे विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी सभागृहाचे कामकाज सुरू करण्यासाठी नोशीर मेहता या नगरसेवकाच्या नावाची शिफारस केली. महापौर व सेना नगरसेवक उपस्थित नसल्याने नियमाप्रमाणे मेहता यांना महापौरांच्या जागी बसवावे लागले असते. महापौर आंबेकर यांना ही माहिती कळताच त्या सभागृहात आल्या. वंदे मातरम संपल्यानंतर काँग्रेसने मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत चर्चेची मागणी केली. मात्र, महापौरांनी ही मागणी फेटाळून लावली. या वेळी काँग्रेस सदस्यांनी महापौरांच्या विरोधात घोषणा देत सभात्याग केला. पण, पालिका अधिनियमानुसार सभागृह चालवण्यासाठी ४५ नगरसेवक सभागृहात उपस्थित असणे आवश्यक आहे. पण, काँग्रेसच्या सभात्यागामुळे भाजपचे अवघे १८ नगरसेवक शिल्लक राहिले. त्यामुळे कामाठीपुरा येथील इमारत दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांना श्रद्धांजली वाहून सभा तहकुबीचा प्रस्ताव महापौरांना ठेवावा लागला. अखेर, पालिकेच्या इतिहासात प्रथमच सत्ताधारी पक्षाला पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे सभा तहकूब करावी लागली.