महालक्ष्मी येथील रेसकोर्सच्या जागेवर ‘थीम पार्क’ बनविण्याचा मुद्दा शिवसेनेनेने प्रतिष्ठेचा केला आहे. मुंबईकरांना मोकळा श्वास घेण्यासाठी एक तरी जागा आहे का, असा भावनिक सवालही त्यांनी केला. गेली २० वर्षे मुंबईवर सत्ता गाजविणाऱ्या शिवसेनेचा सर्वेसर्वा नेताच रेसकोर्सवरील संकल्पना उद्यानाचे श्रेय सरकारला बहाल करण्याचा उदारपणाही दाखवू लागल्याने, पालिकेच्या २० वर्षांच्या कारभारातील अनेक अपश्रेयाचे धनी कोणाला ठरवावे, असा संभ्रम सामान्य मुंबईकराच्या मनात माजला आहे. रेसकोर्सच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान बनविण्याचे स्वप्न साकारण्यासाठी आटापिटा करणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेला अखेरचा श्वास घेत असलेली मुंबईतील असंख्य उद्याने दिसू नयेत, याबद्दलही आश्चर्य व्यक्त होत आहे. वर्षांनुवर्षे बेदखलच असलेली ही उजाड उद्याने पुन्हा फुलविली, तरी एखादा मोकळा श्वास वाटणीला येईल, अशीही भावना व्यक्त होत आहे.