निवडणूक आचारसंहितेपूर्वी प्रकल्पांचे लोकार्पण करण्याचे उद्दिष्ट

मुंबई : लोकसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून आचारसंहिता जारी होण्यापूर्वी पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने नव्या प्रकल्पांचे भूमीपूजन आणि लोकार्पणाचा धडाका लावला आहे. त्याचाच एक भाग म्हणून भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यानातील (राणीची बाग) पूर्ण झालेल्या कामांचे उद्घाटन आणि सुरू होणाऱ्या कामांच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचे बुधवारी आयोजन करण्यात आले आहे. यात राणीच्या बागेतील गांडुळखत प्रकल्प, विविध प्राण्यांसाठी उभारलेले पिंजरे, स्वतंत्र क्षेत्र, प्राण्यांसाठी किचन कॉम्प्लेक्स आदींचा समावेश आहे.

मुंबईमधील सर्वात मोठा गांडुळखत प्रकल्प राणीच्या बागेत उभारण्यात आला आहे. तब्बल दोन हजार चौरस मीटर क्षेत्रात उभारलेल्या या प्रकल्पात दररोज जमा होणाऱ्या सुमारे एक हजार ते १५०० किलो पालापाचोळा यंत्राच्या साह्याने बारीक केला जातो आणि त्यापासून खत तयार केले जाते.

त्याचबरोबर काकर, सांबर, चितळ आदी प्राण्यांसाने नवे पिंजरे तयार करण्यात आले आहेत.

प्राण्यांसाठी शाकाहारी आणि मांसाहारी खाद्य तयार करण्यासाठी सुसज्ज असे किचन कॉम्प्लेक्स उभारण्यात आले आहे. राणीच्या बागेत दाखल होणारे वाघ, सिंह, बिबटय़ा यांच्यासाठी स्वतंत्र क्षेत्र तयार करण्यात आले आहे.

वाघ, सिंह आणि बिबटय़ाला सुरुवातीला वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी स्वतंत्र क्षेत्रात (क्वारंटाइन झोन) ठेवण्यात येणार आहे. नवी दिल्ली येथील केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या सूचनेनुसार ब्रिटिशकालीन ‘स्टोनी ग्रोटो’ या हिमालयीन अस्वलाच्या पिंजऱ्याचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. प्राणिसंग्रहालयातील ‘इंटरप्रिटेशन सेंटर’च्या इमारतीच्या तळमजल्यावर तब्बल २०५ आसनक्षमता असलेले थ्रीडी थिएटर उभारण्यात आले असून यात विविध प्राणी, पक्षी, पर्यावरणविषयक माहितीपट, डिस्कव्हरी आणि अ‍ॅनिमल प्लॅनेटकडील माहितीपट दाखविण्यात येणार आहेत.

आज कार्यक्रम

प्राणिसंग्राहलयाच्या परिसरात २०० सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्यांसाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. या सर्वाचे लोकार्पण आणि उद्घाटनाचा कार्यक्रम बुधवारी, ६ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून त्यानंतर तात्काळ आचारसंहिता जारी होणार आहे. आचारसंहिता जारी होण्यापूर्वीच राणीच्या बागेतील कामांचे लोकार्पण आणि उद्घाटन करण्याचा निर्णय सत्ताधारी शिवसेनेने घेतला आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी राणीच्या बागेत आयोजित कार्यक्रमात शिवसेना नेते आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण आणि होऊ घातलेल्या कामांचे भूमीपूजन करण्यात येणार आहे.