पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात काँग्रेसने देशभरात बंदची हाक दिली होती. मुंबईत या बंदचा फारसा प्रतिसाद दिसला नाही मात्र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा दुतोंडी चेहरा मात्र पुन्हा एकदा दिसला अशी टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी केली. एकीकडे सरकारचा विरोध करायचा आणि दुसरीकडे त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरायचे नाही, आंदोलन करायचे नाही ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका कायमच राहिली आहे. त्यातले सातत्य आजही पाहायला मिळाले असेही राणे यांनी म्हटले.

एक भूमिका घ्यायची आणि मग कोलांटउडी मारायची ही शिवसेनेची जुनी सवय आहे असाही टोला नारायण राणेंनी लगावला. महागाईची जबाबदारी जेवढी भाजपाची आहे तेवढीच शिवसेनेचीही आहे. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे शिवसेना सहभागी आहे. त्यामुळे महागाईची, इंधनदरवाढीची जबाबदारी त्यांचीही आहे. सत्तेत असताना विरोध करायचा आम्हाला जनहित महत्त्वाचे आहे म्हणायचे आणि बंदमध्ये सहभागी व्हायचे नाही हा शिवसेनेचा दुटप्पीपणा आता जनतेलाही ठाऊक झाला आहे, अशीही टीका राणे यांनी केली.

केंद्र सरकारने इंधनाचे दर आमच्या हाती नाहीत असे म्हणत जबाबदारी झटकली आहे. तर काही वेळापूर्वीच काँग्रेसने सरकार आमच्या एकजुटीला घाबरले आहे अशी टीका केली आहे. काँग्रेसने पुकारलेल्या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे यांसह सगळ्याच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला. शिवसेनेने अग्रलेखातून सरकारवर ताशेरे झाडले होते. मात्र शिवसेना सत्तेत सहभागी झाली नाही त्यामुळे काँग्रेसनेही शिवसेनेवर टीका केली. आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे खासदार नारायण राणे यांनीही शिवसेनेवर टीका केली.