News Flash

सरकार स्थापण्याची शिवसेनेला घाई

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्यावर दोन दिवसांपूर्वीच प्राथमिक चर्चा झाली.

(संग्रहित छायाचित्र)

काँग्रेस-राष्ट्रवादीत चर्चेचा घोळच; निर्णय दिल्लीत श्रेष्ठींकडे

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संयुक्त सरकार स्थापन करण्याची चर्चा सुरू झाली असली तरी अद्याप या दृष्टीने फारशी प्रगती झालेली नाही. या विलंबामुळे शिवसेना घायकुतीला आली आहे. सरकार स्थापण्यासाठी शिवसेना घाई करीत असतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मात्र चर्चेचा घोळ सुरूच आहे. त्यामुळे तीन पक्षांची नवी आघाडी आकारास येण्यास आणखी किती काळ लागणार याचीच राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्यावर दोन दिवसांपूर्वीच प्राथमिक चर्चा झाली. त्यानंतर पुढे तीन पक्षांची संयुक्त बैठक झालेली नाही. शिवसेनेबरोबर हातमिळवणी करायची की नाही याचा सारा निर्णय नवी दिल्लीच्या पातळीवर घेतला जाईल, असे काँग्रेसने शिवसेनेकडे स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या नेत्यांकडून आढावा घेतला. शिवसेनेला मात्र सरकार स्थापण्याची घाई झाली आहे. कारण आघाडीचा निर्णय लवकर घ्या, असे निरोप शिवसेनेकडून काँग्रेसच्या नेत्यांना पाठविण्यात येत आहेत.

चर्चेचा घोळ सुरू राहिल्यास त्यातून सरकार स्थापण्याची संधी जाईल, अशी शिवसेनेला भीती वाटते. भाजपकडून तिन्ही पक्षांच्या आमदारांना संपर्क साधला जात आहे. भाजपला संख्याबळाचा विश्वास निर्माण झाल्यास लगेचच दावा केला जाईल आणि राज्यपाल भाजपला तात्काळ सरकार स्थापण्यास पाचारण करू शकतात याचाही शिवसेनेला अंदाज आहे. यातूनच शिवसेना घायकुतीला आल्याचे समजते.

सोनियांची नाराजी

* शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार स्थापन करण्यास काँग्रेस नेतृत्वाने अनुकूलता दर्शविल्यावर लगेचच राज्यातील काँग्रेस नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत सरकार स्थापण्याबाबत चर्चा करण्यात आली. ही बाब काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पसंत पडली नाही.

* कारण काँग्रेस नेत्यांनी आधी राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा करावी, अशा स्पष्ट सूचना राज्यातील काँग्रेस नेत्यांना देण्यात आल्या होत्या. पण राज्यातील नेत्यांनी परस्पर ठाकरे यांची भेट घेतल्याने सोनियांनी नाराजी व्यक्त करीत काँग्रेस नेत्यांचे कान उपटल्याचे सांगण्यात येते. यातूनच दिल्लीतून निर्णय झाल्याशिवाय पुढील काहीच चर्चा किंवा हालचाली करायच्या नाहीत, असा निर्णय राज्यातील काँग्रेस नेत्यांनी घेतला.

* सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. ही भेट येत्या दोन-तीन दिवसांत होण्याची शक्यता आहे.

* पवारांच्या सोनिया भेटीनंतरच राज्यातील सरकार स्थापण्याच्या हालचालींना वेग येऊ शकेल. अर्थात, काँग्रेसने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल अजूनही काँग्रेस आणि शिवसेनेच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे.

राहुल यांच्या भूमिकेकडे लक्ष

* शिवसेनेशी आघाडी करण्याबाबत राहुल गांधी कोणती भूमिका घेतात याकडे शिवसेनेबरोबरच भाजप नेत्यांचेही लक्ष लागले आहे.

* काँग्रेसचे सर्व निर्णय अजूनही राहुल यांच्या सूचनेनुसारच होतात. त्यांनी अजूनही महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत मतप्रदर्शन केलेले नाही.

* भाजपविरोधी सरकार स्थापन होऊ शकले नाही तर त्याचे खापर आपल्यावर फुटू नये, असा काँग्रेसचा प्रयत्न असेल.

राज्यपालांची भेट रद्द

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तिन्ही पक्षांचे शिष्टमंडळ शनिवारी दुपारी ४.३० वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होते. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीच्या मागणीसाठी ही भेट घेण्यात येणार होती. मात्र, ही भेट ऐनवेळी रद्द करण्यात आली. परंतु तिन्ही पक्षांचे नेते आणि आमदार आपापल्या मतदारसंघांत गेल्याने ही भेट पुढे ढकलण्यात आल्याचे शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. आमदारांना निवडणूक खर्चाचा तपशील दोन दिवसांत सादर करायचा होता. यामुळे आमदार मंडळी मतदारसंघात होती, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

शिवसेनेशी आघाडी करण्याचा निर्णय दिल्लीतच घेतला जाईल. किमान समान कार्यक्रमावर चर्चा करून त्याचा मसुदा नेतृत्वाकडे पाठविण्यात आला असून आता सर्व चर्चा दिल्लीत होईल.

– बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 1:32 am

Web Title: shiv sena is in a hurry to form a government abn 97
Next Stories
1 सुसाट वाहनांच्या वेगाला उद्यापासून लगाम
2 अदानी, रिलायन्सही टोलवसुलीत!
3 प्रयोगांद्वारे विज्ञानातील गमतीजमती उलगडत बालविज्ञान संमेलनाचे उद्घाटन
Just Now!
X