शिवसेनेची भूमिका केसाळ कुत्र्यासारखी आहे अशी टीका करत राज ठाकरे यांनी आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केली. ज्या पक्षाला स्वतःची भूमिका नाही त्या पक्षाबद्दल काय बोलणार असे सांगताना राज ठाकरे यांनी शिवसेनेची तुलना अशा कुत्र्याशी केली जो इतका केसाळ असतो की त्याचे तोंड कुठल्या बाजूला आहे तेच कळत नाही असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. या कुत्र्याला इथून बघायचं की तिथून बघायचं हेच कळत नाही असं सांगत शिवसेना धोरण नसलेला व फक्त पैशाची कामं होण्यासाठी सत्तेत राहिला असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला.

त्याचसोबत भाजपावरही राज ठाकरेंनी जोरदार टीका केली. भाजपा सत्तेत असताना पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणे, गॅसचे दर वाढणे हे लाजिरवाणे आहे. आज तुम्ही सांगता की इंधनाचे दर आमच्या हातात नाही मग जेव्हा विरोधात होतात तेव्हा आंदोलन का केले होते? असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरेंनी भाजपावर शरसंधान केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपावर निशाणा साधला.

तुमच्या हातात जर दरांचे नियंत्रण  नाही तर आंध्र प्रदेश सरकार आणि राजस्थान सरकारने पेट्रोल डिझेलचे दर कसे कमी केले असाही प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. काँग्रेसच्या आंदोलनात मनसे का? असाही प्रश्न विचारला जातो. आमच्यासाठी महत्त्वाचे पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत. महागाईचा भडका उडाला आहे त्यामुळे आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आंदोलन केले असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. आज सामान्य माणसाला जो त्रास सहन करावा लागतो आहोत त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो होतो असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.