चंद्रपूर, डहाणू, गडचिरोली, मेळघाट आणि मोखाडा यासारख्या दुर्गम भागातील रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळून परिणामकारक आरोग्यसेवा उपलब्ध होण्यासाठी शिवसेनेच्या शिव आरोग्य योजनेद्वारे सोमवारपासून टोलिमेडिसीन सेवा सुरु करण्यात आली. संपूर्णपणे मोफत असलेल्या या सेवेचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले असून आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या संकल्पनेतून ही योजना आकाराला आली आहे.
दुर्गम भागातील रुग्णांना उपचारासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी पंचवीस डॉक्टरांचा एक विशेष पथक मुंबईत निर्माण करण्यात आले असून हृदयविकार, कान-नाक-घसा, बालरोगतज्ज्ञ आदी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा या पथकात समावेश आहे. हे डॉक्टर इंटरनेट तसेच दूरध्वनीद्वारे संबंधित रुग्णांच्या अहवालाची माहिती घेऊन स्थानिक डॉक्टरांना उपचारासाठी योग्य ते मार्गदर्शन करतील असे डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या विकासाचा गोरगरीब रुग्णांना फायदा व्हावा यासाठी ही योजना शिवसेनेच्या माध्यमातून राबविण्यात येत असून ही योजना शासकीय पातळीवरही प्रभावीपणे राबवता येईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
गंभीर आजाराच्या रुग्णांचे इसीजी, एमआरआय तसेच एक्स-रे यांची मोठय़ा पडद्यावर पाहाणी करून मुंबईतील डॉक्टर उपचाराबाबत मार्गदर्शन करणार असून ज्या ठिकाणी विजेची समस्या असेल तेथे सौरउर्जा व जनित्रांचा वापर करण्यात येणार असल्यामुळे विनाखंड रुग्णोपचार केले जातील, असा विश्वास डॉ. सावंत यांनी व्यक्त केला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक रुग्णाची इ-फाईल करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही भागातून डॉक्टरांना रुग्णोपचारासाठी योग्य मार्गदर्शन करणे शक्य होईल.