News Flash

सेनाप्रमुखांच्या स्मारकाला विलंबावरून नाराजी

स्मारकाबाबत हालचाली सुरू न झाल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे काही वेळा विचारणा केली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

शिवसेना नेत्यांची सरकारवर टीका
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजीपार्क येथील महापौर बंगल्यातील स्मारकासाठी विलंब होत असल्याने शिवसेना नेते व कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’, असे टीकास्त्र उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सरकारच्या गतिमानतेवर सोडले आहे. तर हा विलंब कोणामुळे झाला, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला असून ‘मंत्रालयात बसणाऱ्यांनी त्याचा विचार केला पाहिजे,’ असा टोला लगावला आहे. स्मारकाचे काम मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच बैठक बोलाविणार असून त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रित केले जाणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.
शिवसेनाप्रमुखांच्या तिसऱ्या स्मृतिदिनी म्हणजे १७ नोव्हेंबरला स्मारकाची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी करूनही काहीच हालचाल न झाल्याने शिवसेना नेते व कार्यकर्ते चिडले आहेत. युतीचे सरकार असताना शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी ही गतिमानता असेल, तर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी कशी पावले टाकणार, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
स्मारकाबाबत हालचाली सुरू न झाल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे काही वेळा विचारणा केली. शेवटी त्यांना पत्रच दिले, असे देसाई यांनी सांगितले. आता महापालिका आयुक्तांना निर्देश देण्यात येत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. स्मारकाचा आराखडा, समिती व अन्य बाबींसाठी बैठक बोलाविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर लालफितीच्या विरोधात आवाज उठविला व संघर्ष केला. त्यांचेच स्मारक या कारभारामुळे अडकत असेल, तर ते दुर्दैवी आहे. त्याबाबत मंत्रालयात बसणाऱ्यांनी विचार केला पाहिजे.
– संजय राऊत, शिवसेना खासदार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 2:49 am

Web Title: shiv sena leader criticism on government
टॅग : Shiv Sena
Next Stories
1 सरकारच्या विरोधात आठवले मैदानात
2 अनुकंपा तत्त्वावरील शिक्षक भरती कंत्राटी पद्धतीने
3 ‘लोकसत्ता संपादक शिफारस’चे तिसरे नाटय़पुष्प..‘ढोलताशे’!
Just Now!
X