शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर थेट आरोप केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले माजी खासदार मोहन रावले यांनी आज(शुक्रवार) राष्ट्रवादी काँग्रेसचा मार्ग स्विकारला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव यांच्या उपस्थितीत मोहन रावले यांनी अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे मोहन रावले मनसेत प्रवेश करतील अशी अटकळ होती. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही रावलेंनी भेट घेतली आणि आज अखेर अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोहर रावले सामिल झाले.
मोहन रावले शिवसेनेकडून तब्बल पाचवेळा खासदार राहिलेले आहेत. ‘चार वर्षांपासून मला उद्धव ठाकरे यांची भेट मिळू शकली नाही. सामान्य कार्यकर्ता बाळासाहेब ठाकरे यांना भेटू शकत होता. मनोहर जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने माफी मागणे चुकीचे होते. अस्तनीतला निखारा मी नव्हे तर मिलिंद नार्वेकर आहेत. तेच पक्ष चालवितात. मागे बाळासाहेब ठाकरे यांनीही मिलिंदच्या वर्तणुकीबद्दल संताप व्यक्त केला होता’, असा घरचा आहेर रावलेंनी दिल्यामुळे पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.