काही दिवसांपूर्वी नितीन नांदगावकर यांनी टॅक्सी चालक मीटरच्या माध्यमातून आपली कशी फसवणूक करतात याचा खुलासा केला होता. बटन असलेल्या मीटरमध्ये हे टॅक्सीचालक आपली कशी फसवणूक करतात हे त्यांनी दाखवून दिलं होतं. त्यानंतर आता रिक्षामध्ये बटनाच्या सहाय्यानं मीटर फास्ट करून ग्राहकांची कशी लूट केली जाते याचा व्हिडीओ त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरून शेअर केला आहे.

शिक्षाचालक सर्वसामान्य ग्राहकांची कशाप्रकारे लूट करतात याचा एक व्हिडीओ शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी शेअर केला आहे. रिक्षा चालक आपल्या हाताकडे एक बटन लावून ठेवतात आणि त्या बटणाच्या सहाय्यानं रिक्षाचं मीटर फास्ट केलं जातं असं ते या व्हिडीओच्या माध्यमातून दाखवत आहेत. जनतेची फसवणूक करणाऱ्या समाजकंटकांना कठोर कारवाई करण्याची गरज आहे. अशा प्रवृत्तीच्या विरोधात वेळीस उपाययोजना कराव्याच लागतील नाहीतर सर्वसामान्य जनतेला नेहमीच लुबाडले जाईल, असं नांदगावकर यांनी यावेळी सांगितलं.

कायद्याचा धाक हा महत्त्वाचा आहे. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यापक मोहीम हाती घेऊन अशा समाजकंटकांना जरब बसवावी. नागरिकांनीदेखील सतर्क राहणं गरजेचे आहे. तसंच लांबच्या प्रवासात मीटरकडे लक्ष द्यावं अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली आहे. यापुढे रिक्षा-टॅक्सीमध्ये असे घोडा बटन दिसले तर त्या रिक्षा-टॅक्सी कायमच्या भंगारात दिसतील याची काळजी आम्हीच घेऊ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.