News Flash

आदित्य ठाकरे यांना शिवसेना नेतेपदी बढती

राजकीय पक्षांना संघटनात्मक निवडणुकांची औपचारिकता पार पाडावी लागते.

आदित्य ठाकरे  (संग्रहित छायाचित्र)

शिवसेनेची आज संघटनात्मक निवडणूक; एकहाती सत्तेचा ठराव, भाजप लक्ष्य

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार शिवसेनेच्या संघटनात्मक निवडणुकीची औपचारिकता मंगळवारी पार पाडली जाणार असून, आदित्य ठाकरे यांना नेते म्हणून बढती मिळणार आहे. याशिवाय पक्षात नव्या पदांची निर्मिती केली जाणार असून, राजकीय ठरावांमध्ये भाजपला लक्ष्य केले जाणार आहे. एकहाती सत्ता हे आगामी काळात शिवसेनेचे मुख्य उद्दिष्ट असेल.

राजकीय पक्षांना संघटनात्मक निवडणुकांची औपचारिकता पार पाडावी लागते. त्यानुसार पंचवार्षिक निवडणुकांची प्रक्रिया शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पार पाडली जाणार आहे. या पाश्र्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना नेतेपदी बढती मिळणार आहे. ठाण्यातील प्रभावशाली नेते एकनाथ शिंदे आणि आमदार अनिल परब यांच्याकडेही नेतेपदाची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे. पक्षात नव्या पदांची निर्मिती केली जाणार आहे. त्यानुसार मनोहर जोशी, सुधीर जोशी, लीलाधर डाके आदी नेत्यांवर मार्गदर्शकाची वेगळी जबाबदारी सोपविली जाईल. २०१९च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने व्यूहरचना निश्चित केली जाईल.

पक्षाच्या बैठकीत विविध राजकीय ठराव मंजूर करण्यात येणार आहेत. कर्जमाफीच्या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. त्याबद्दल ठराव करण्यात येणार आहे. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी हा ठराव करण्यात येणार आहे. हिंदुत्व आणि मराठी या दोन्ही मुद्दय़ांचा राजकीय ठरावांमध्ये समावेश असेल. विधानसभा निवडणूक आणि गेल्या वर्षी झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अमराठी भाषकांची मते शिवसेनेला मिळाली नव्हती. विशेषत: उत्तर भारतीय आणि गुजराती मतदारांची एकगठ्ठा मते भाजपच्या परडय़ात पडली होती. फक्त मराठी मतांवर डोळा ठेवून मुंबईत निभाव लागणे कठीण आहे. याचा शिवसेनेला अंदाज आल्याने पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे मांडण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • एकहाती सत्ता हे शिवसेनेचे लक्ष्य आहे. मंगळवारी होणाऱ्या बैठकीत एकहाती सत्ता यावर भर दिला जाणार आहे. भाजपकडून केल्या जाणाऱ्या कोंडीच्या पाश्र्वभूमीवर एकहाती सत्ता यावर शिवसेना आता भर देणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2018 4:07 am

Web Title: shiv sena leader post aditya thackeray
Next Stories
1 ‘ऑनलाइन’ शिष्यवृत्ती योजना ‘ऑफलाइन’!
2 सिमी, इंडियन मुजाहिदीनची कुंडली कुरेशी मांडणार?
3 श्रमिक, हमालांची ‘स्पर्धा’ परीक्षा!
Just Now!
X