शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यावरुन सुरु असलेल्या वादात आता शिवसेनेने उडी मारली आहे. शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी शबरीमलाप्रकरणी भाजपाच्या भुमिकेवर टीकास्त्र सोडले आहे. भारतात मशिदींचे राजकारण झाले, आता मंदिराचे राजकारण सुरु असल्याचा आरोप करत शबरीमला मंदिर महिलांसाठी खुले करण्याचा न्यायालयीन निर्णय भाजपा मानायला तयार नाही. पण महाराष्ट्रात कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात व शनिशिंगणापूर मंदिरात महिलांना प्रवेशाबाबत त्यांनी उलट भूमिका घेतली असल्याचे सांगत भाजपाचे हे ढोंगाचे थडगे असल्याची बोचऱ्या शब्दांत टीका केली.

सर्वोच्च न्यायालयाने महिलांना शबरीमाला मंदिरात जाण्यापासून रोखू नये असा निकाल दिला. मंदिर महिलांसाठी खुले केले. या निर्णयाविरुद्ध महिलाच रस्त्यावर उतरल्या. जे हिंदुत्ववादी राममंदिरावर उघडपणे भूमिका घ्यायला कचरतात व राममंदिराचा प्रश्न न्यायालयात आहे असे सांगून पळ काढतात ते भाजपा नेते शबरीमाला मंदिराचा निर्णय मानायला तयार नाहीत. न्यायालयाने श्रद्धा व आस्थांच्या विषयात लुडबुड करू नये असे जाहीरपणे सांगतात, तेव्हा आश्चर्य वाटते. मंदिरातील महिला प्रवेशाबाबत भाजपाचे राष्ट्रीय धोरण पुरोगामी महाराष्ट्राच्या विरुद्ध आहे, असा टोला त्यांनी लगावला. ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातून त्यांनी भाजपावर टीका केली.

त्र्यंबकेश्वर मंदिर व शनिशिंगणापूर मंदिराबाबत भाजपाचा हाच दुटप्पीपणा उघडा पडला आहे. शनिशिंगणापूर मंदिराच्या चौथऱयावर प्रवेश करण्यापासून महिलांना रोखले जाते. हे सर्व प्रकरण काही महिलांनी उच्च न्यायालयात नेले व कोर्टाने शनिशिंगणापूर देवस्थानाच्या चौथऱ्यावरही महिलांना प्रवेश द्यावा असा निर्णय देताच भाजपाच्या महिला आघाडीने या निर्णयाचे जोरदार स्वागत केले. महिला शक्तीचा हा विजय जणू फक्त भाजपामुळेच मिळाला असे तुणतुणे वाजवले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शनिशिंगणापुरात महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले होते. पुरोगामी महाराष्ट्राचा हा विजय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पण या सर्व मंदिरांत महिलांनी घुसावे असे सांगणाऱयांनी शबरीमाला मंदिरात महिलांना जाण्याचा अधिकार नाही व न्यायालयाने यात पडू नये असे सांगावे, हे ढोंग आता उघडे पडले आहे. दलितांना प्रवेश नाकारणाऱया मंदिराविरोधात आंदोलन करणारा हा महाराष्ट्र आहे. मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणारा महाराष्ट्र हाच आहे. कोणत्याही उंच पुतळय़ाशिवाय महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची उंची उत्तुंग आहे. महाराष्ट्राने ढोंगांचे थडगे बांधले. ते ढोंग ‘शबरीमाला’ मंदिर प्रकरणात थडग्यातून बाहेर पडले, असा घणाघाती वार त्यांनी भाजपावर केला. महाराष्ट्रात जे पुरोगामित्व ठरते ते केरळात धर्मद्रोही कसे ठरेल? असा सवाल करत त्यांनी केला. शबरीमाला, अंबाबाई, शनिशिंगणापूरचा धर्म व आस्था वेगळय़ा नाहीत आणि न्यायालयाचा निर्णय वेगळा नाही, असेही ते म्हणाले.