आगामी वर्षांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळविताना प्रशासनाने महापौरांना विकासकामांसाठी दिलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीवरून महापालिकेत रण पेटलेले असतानाच आता शिवसेनेमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. आपल्या मर्जीतील नगरसेवकांवर महापौरांनी कोटय़वधींची ‘अर्थ’पूर्ण उधळण केल्यामुळे शिवसेनेतील नगरसेविका संतापल्या आहेत. विरोधकांनी गोंधळ घातल्यानंतर महापौरांच्या मदतीला धावणाऱ्या या नगरसेविकांनी यापुढे सभागृहात शांत बसून राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महापौर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या २०१५-१६ च्या अर्थसंकल्पाला सभागृहाची मंजुरी मिळविण्यापूर्वी प्रशासनाने विकासकामांसाठी महापौर स्नेहल आंबेकर यांना १०० कोटी रुपये निधी दिला. नगरसेवकांना यापैकी किती निधी द्यायचा याचे अधिकार महापौरांनाच आहेत. शिवसेनेतील आपल्या मर्जीतील, तसेच सभागृहात कायम विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांतील नगरसेवक-नगरसेविकांवर या निधीतील कोटय़वधी रुपयांची महापौरांनी उधळण केली आहे. या प्रकारामुळे शिवसेनेच्या नगरसेविका खवळल्या आहेत.
 सभागृहात विरोधक आक्रमक झालेले असताना कोटय़वधी रुपये निधी मिळालेल्या या नगरसेविका केवळ बघ्याची भूमिका घेतात; स्नेहल आंबेकर यांनी त्यांच्यावरच कोटय़वधी रुपयांची खैरात केली आहे. मग विरोधक सभागृहात गोंधळ घालतात तेव्हा आम्ही महापौरांची पाठराखण का करायची, असा सवाल कमी निधी मिळालेल्या नगरसेविकांकडून करण्यात येत आहे.

काहींना कोटय़वधीचा निधी
सभागृहात केवळ जांभई देण्यासाठी तोंड उघडणाऱ्या शिवसेनेच्या काही नगरसेविकांना त्यांच्या विभागात विकासकामे करण्यासाठी महापौरांनी कोटय़वधी रुपयांचा निधी दिला आहे. काहींच्या पदरात तीन कोटी रुपये, तर काहींच्या पाच कोटी रुपये पडले आहेत, तर काही नगरसेविकांची २५ लाख ते ५० लाख रुपयांवर बोळवण करण्यात आली आहे.