मिठागरांच्या जमिनी बिल्डरांसाठी खुली करण्यावरून मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना आक्रमक

मुंबई : मुंबईच्या विकास आराखडय़ात मिठागरांच्या जमिनी परवडणारी घरे बांधण्यास मोकळ्या केल्याबद्दल शिवसेनेचे नेते व पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारला धारेवर धरत या निर्णयास विरोध केला. मिठागरांच्या मोकळ्या जमिनीवर लाखो घरे बांधली गेली की मुंबईचे पर्यावरण बिघडून शहराचे रूपांतर गॅस चेंबरमध्येच होईल. राज्य सरकारला काय मुंबईची दिल्ली करायची आहे काय, असा संतप्त सवाल करत खाल्ल्या मिठाला तरी जागा, शिवसेना मिठागरांच्या जमिनी गिळंकृत करू देणार नाही, असा इशारा कदम यांनी बैठकीत दिला. त्यामुळे शिवसेनेने पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडल्याचे मानले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना सातत्याने भाजपची कोंडी करत आहे. नाणारचा प्रकल्पाला विरोध, नंतर पालघर पोटनिवडणुकीत भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास यांना उमेदवारी जाहीर करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक राजकारणाचा प्रत्यय देत भाजपला कोंडीत पकडले आहे. आता मिठागरांच्या जमिनी घरांसाठी बिल्डरांना खुल्या करण्यावरून शिवसेना भाजपला कात्रीत पकडणार असे चित्र बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीवेळी रामदास कदम यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पुढे आले आहे.

रामदास कदम यांनी बैठकीत मिठागरांच्या जमिनीचा मुद्दा उपस्थित केला. गरिबांसाठी परवडणारी घरे मिठागरांच्या जमिनीवर उभारण्यात येणार असे सांगितले जात आहे. यापूर्वीही महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार असताना कमाल नागरी जमीन धारणा कायदा रद्द करताना असेच सांगितले होते. तेव्हा एकटय़ा शिवसेनेने त्यास विरोध केला होता व ते

बिल्डरधार्जिणे धोरण असल्याचे म्हटले होते. शिवसेनेला एकटे पाडत तो कायदा रद्द केला गेला. किती गरिबांना घरे मिळाली याची आकडेवारी सरकार देऊ शकेल काय, असा सवाल कदम यांनी केला. सरकारमध्ये बसलेले काही अधिकारी अशीच बिल्डरधार्जिणी धोरणे आखतात आणि सत्ताधारी जनतेला भूलथापा मारतात. मात्र मुंबईच्या पर्यावरणाला नख लावण्याचा हा प्रकार शिवसेना कदापि सहन करणार नाही आणि यशस्वीही होऊ देणार नाही, असा इशारा रामदास कदम यांनी फडणवीस यांना दिला.