भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पाच कोटी रुपयांची ऑफर दिली होती, हा शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांचा आरोप भाजपने फेटाळला. आपले अपयश लपवण्यासाठी हर्षवर्धन जाधवांकडून अशी नौटंकी केली जात असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली. जाधव यांचा हा आरोप बिनबुडाचा असून, असले उद्योग करण्याची भाजपला गरज नाही. आमचा कोणत्याच आमदारावर डोळा नसून भाजपकडे चांगल्या कार्यकर्त्यांची फौज आहे. आपले अपयश लपवण्यासाठी जाधव असले नाटक करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

माझ्यासह २५ आमदारांना भाजप प्रवेशासाठी पैशांची ऑफर देण्यात आली होती. गेल्या महिन्यात चंद्रकांत पाटील यांनी एका भेटीदरम्यान ही ऑफर दिली होती, असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला होता. त्याला भाजपकडून उत्तर देण्यात आले.

भाजप प्रवेशासाठी ५ कोटींची ऑफर; शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांचा गौप्यस्फोट

हर्षवर्धन जाधव हे तीन वर्षांपासून आमदार आहेत. मागील तीन वर्षांत त्यांना आपला स्वत:चा निधी खर्च करता आलेला नाही. त्यांनी आपला अपयशाचा पाढाच वाचला. हे अपयश झाकण्यासाठी ते राजकीय नाटक करत आहेत. चंद्रकांत पाटील आणि हर्षवर्धन जाधव यांची विश्वासाहर्ता जनतेला माहिती आहे. राज्यातील जनतेचा चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास आहे. अकार्यक्षमता दडवण्यासाठी हा सगळा प्रकार त्यांनी केला.
आमदारांना निधी दिला जात नसेल तर तो वैधानिक हक्कभंग ठरतो. त्याविरोधात जाधव यांना दाद मागता येते. पण जो आमदार स्वत:चा निधीच खर्च करू शकत नाही त्याच्याबद्दल काय बोलावे, असेही ते ‘एबीपी माझा’शी बोलताना म्हणाले.

भाजप हा राज्यातील मोठा पक्ष आहे. त्यांना असे प्रकार करण्याची गरजच नाही. आमचा कोणाच्याच आमदारावर डोळा नाही. आमच्याकडे चांगल्या कार्यकर्त्यांची वानवा नाही. त्यामुळे असे उद्योग न करता आमचा पक्ष मोठा होतोय, असेही ते म्हणाले. चंद्रकांत पाटील हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. त्यांना कोणताही आमदार भेटू शकतो. त्यापद्धतीने ते भेटले असतील. भाजपची बदनामी केल्याबद्दल आम्ही निश्चितच योग्य ते पाऊल उचलू आणि निर्णय घेऊ, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.