घोडबंदर मार्गावरील विहंग व्हॅली गृहनिर्माण प्रकल्पातील पाणीचोरीच्या प्रकरणावरून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि महापालिका आयुक्त आर.ए. राजीव यांच्यात आता न्यायालयीन लढाई सुरू होणार आहे. सरनाईक यांनी या प्रकरणी महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांच्याविरोधात शुक्रवारी १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला.
छबय्या पार्क आणि विहंग इन येथील बेकायदा बांधकामे ३० दिवसांत नियमित करण्यासंबंधी नोटीस बजाविल्याने दडपण वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असे राजीव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आपण दडपणाला जुमानत नाही, असेही राजीव यांनी स्पष्ट केले.
सरनाईक यांच्या विकासक कंपनीच्या माध्यमातून घोडबंदर मार्गावर उभारण्यात येणारा विहंग व्हॅली गृहनिर्माण प्रकल्प पाणीचोरीच्या आरोपावरून वादात सापडला आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने यासंबंधीचा सविस्तर अहवाल कासरवडवली पोलीस ठाण्यात सादर केला आहे. दरम्यान, विहंग व्हॅली प्रकरणात आपल्या कंपनीविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा चुकीचा आहे, असा दावा शुक्रवारी सरनाईक यांनी केला. शहरातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईसदृश परिस्थिती असताना आयुक्तांच्या बंगल्याला देण्यात आलेल्या जोडण्याही बेकायदा असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. राजीव यांच्या अनेक गैरकृत्यांची माहिती आपणाकडे असून ती आपण बाहेर काढणार आहोत, असा दावाही सरनाईक यांनी केला.